भारतीय वनसेवेतून नितीन काकोडकर सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:49+5:302021-07-01T04:06:49+5:30
नागपूर : प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्यासह वनसेवेतील तीन अधिकारी बुधवारी निवृत्त झाले. या सर्वांना वनभवनात झालेल्या ...
नागपूर : प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्यासह वनसेवेतील तीन अधिकारी बुधवारी निवृत्त झाले. या सर्वांना वनभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला.
नितीन काकोडकर यांच्यासह अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) टी. के. चौबे आणि लेखापाल आर. के. रूषिया यांचाही सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप देण्यात आला. काकोडकर हे १९८७ पासून भारतीय वनसेवेत कार्यरत आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, मंत्रालय, वन संशोधन व प्रशिक्षण शाखा पुणे, वनभवन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास) या पदांवर त्यांनी ३४ वर्षे सेवा दिली. टी. के. चौबे हे सुद्धा १९८७ पासून वनसेवेत कार्यरत आहेत. तर, रुषिया भारतीय लष्करातून स्वेच्छानिवृत्त घेऊन लिपिक ते लेखपाल पदावर पोहचले आहेत. काकोडकर यांचा तात्पुरता पदभार प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) एम. के. राव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
याप्रसंगी साईप्रसाद यांच्यासह अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) एम. के. राव यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना काकोडकर म्हणाले, ३४ वर्षांच्या आपल्या सेवेत अधिकाधिक लोकांना जोडले. चांगले गुण ओळखून वाव देण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, वनसंरक्षक संजय दहीवले, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.