ब्राह्मणांविरुद्धच्या वक्तव्याने नितीन राऊत अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:46 AM2020-03-15T00:46:30+5:302020-03-15T00:48:20+5:30
नागरिकत्व संशोधन कायद्यावरून ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात ब्राह्मण समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकत्व संशोधन कायद्यावरून ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात ब्राह्मण समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. राऊत यांनी एकतर समाजाची जाहीर माफी मागावी किंवा त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी ब्राह्मण सेनेतर्फे शनिवारी पत्रपरिषदेत करण्यात आली.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचार संवर्धन समितीच्यावतीने इंदोरा मैदानात झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नागरिकत्व संशोधन कायदा करून नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कागदपत्र मागितले जात आहेत. ‘जे स्वत: परदेशातून आले आहेत, ते बामन आम्हाला अक्कल शिकवतील काय,’ अशा शब्दात राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील ब्राह्मण समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे परशुराम सेवा संघ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे तर नागपुरात ब्राह्मण सेना फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष त्रिवेदी यांनी राऊत यांच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त केला. ब्राह्मण समाजाच्या विविध संघटना आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, संविधानिक पदावर विराजमान असलेल्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना कोणत्याही जातीधर्माचा अनादर करणार नाही, सर्व लोकांना समान वागणूक देईल, अशी शपथ घेतली आहे. अशावेळी या जबाबदार पदावर विराजमान असलेल्या व्यक्तिकडून एका समाजाबाबत द्वेष बाळगणे योग्य नाही. सीएए, एनआरसी लागू करणे हा सरकारचा निर्णय आहे, तो ब्राह्मण समाज किंवा कोणत्याही वर्गविशेषाचा निर्णय नाही. अशावेळी सरकारवर आक्षेप घेण्याऐवजी ब्राह्मण समाजाला दोष देणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्रिवेदी यांनी उपस्थित केला. त्यांच्याविरोधात लवकरच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येईल. त्यांनी माफी मागितली नाही किंवा त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर ब्राह्मण संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनीष त्रिवेदी यांनी दिला. पत्रपरिषदेत ब्राह्मण महासंघाचे सचिव पं. त्रिलोकनाथ सिंधरा, फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रतीक त्रिवेदी, विदर्भ अध्यक्ष ज्योती अरविंद अवस्थी, राजस्थानी गौड ब्राह्मण समितीचे विक्रम शर्मा आदी उपस्थित होते.