निजामुद्दीन-सिकंदराबाद दुरांतोचा अपघात टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 08:23 PM2018-10-27T20:23:13+5:302018-10-27T20:24:15+5:30
निजामुद्दीनवरून सिकंदराबादला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या कोचचे वेल्डींग तुटले. ही बाब नागपूर रेल्वेस्थानकावर लक्षात आल्यामुळे या गाडीचा मोठा अपघात होण्यापूर्वीच हा कोच बदलण्यात आला. दरम्यान कोचमधील प्रवाशांचे साहित्य दुसरीकडे हलविण्यासाठी कुलींनी नि:शुल्क सेवा दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निजामुद्दीनवरून सिकंदराबादला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या कोचचे वेल्डींग तुटले. ही बाब नागपूर रेल्वेस्थानकावर लक्षात आल्यामुळे या गाडीचा मोठा अपघात होण्यापूर्वीच हा कोच बदलण्यात आला. दरम्यान कोचमधील प्रवाशांचे साहित्य दुसरीकडे हलविण्यासाठी कुलींनी नि:शुल्क सेवा दिली.
रेल्वेगाडी क्रमांक १२२८६ हजरत निजामुद्दीन-सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस सकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. या गाडीची नियमित तपासणी करीत असताना सिनियर सेक्शन इंजिनियर अजिंक्य राजपूत आणि मेकॅनिक मिलिंद धोबाजी यांना इंजिनपासून पाचव्या क्रमांकावर असलेला बी ४ हा कोच उजव्या बाजूला झुकलेला दिसला. शंका आल्यामुळे त्यांनी लगेच या कोचची तपासणी केली. तपासणीनंतर त्यांना कोचच्या चेसीसचे वेल्डींग एक ते दीड फूट तुटलेले दिसले. लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन कोचच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. कोच गाडीपासून वेगळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नादुरुस्त असलेल्या कोचमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. या प्रवाशांना दुसऱ्या कोचमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेस्थानकावरील कुली उस्मान खान, रामवीर सिंग, पप्पु अस्लम, राजवीर, वीरेंदर यांनी कोचमधील प्रवाशांचे सामान नि:शुल्क दुसऱ्या कोचमध्ये पोहोचविण्यास मदत केली. चेसीसचे वेल्डींग तुटल्याचे वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा पुढे जाऊन या गाडीचे कोच रुळावरून घसरून मोठा अपघात घडला असता. दोन तासानंतर ७.३० वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.