मनपा प्रशासन सतर्क : कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 09:49 PM2021-03-18T21:49:08+5:302021-03-18T22:05:17+5:30
Covid Care Center, Nagpur news पाचपावली व व्हीएनआयटी वगळता अन्य ठिकाणचे सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र मागील महिनाभरात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, पुन्हा सर्व सेंटर सुरू करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याची सुविधा झाल्यापासून शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये(सीसीसी)मागील काही महिन्यात खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी झाली. यामुळे पाचपावली व व्हीएनआयटी वगळता अन्य ठिकाणचे सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र मागील महिनाभरात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, पुन्हा सर्व सेंटर सुरू करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
आमदार निवास येथील सीसीसी केंद्र गुरुवारी सुरू करण्यात आले. लवकरच वनामती, सिम्बाॅयसिस सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासन तयारीला लागले आहे. सुरुवातीला पाच कोविड केअर सेंटरमध्ये १४६० खाटा उपलब्ध होत्या. आता पाचपावली व व्हीएनआयटी येथे ३५० खाटा आहेत. सध्या येथे २०० रुग्ण वास्तव्यास आहेत. आमदार निवास येथील केंद्र सुरू झाल्याने पुन्हा ३५० खाटा उपलब्ध होणार आहेत. गरज भासल्यास अन्य केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
क्वारंटाईन सेंटरचे सीसीसीमध्ये रूपांतर
कोविडच्या सुरुवातीला कोरोना संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर निर्माण करण्यात आले होते. परंतु लक्षणे किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने ज्यांच्याकडे होम आयसोलेशनची व्यवस्था नाही, अशांसाठी क्वारंटाईन सेंटरलाच सीसीसीचे स्वरूप देण्यात आले होते.
मनुष्यबळाची समस्या
गेल्या वर्षी मनपाने पाचपावली, व्हीएनआयटी, सिम्बाॅयसिस, वनामती, आमदार निवास आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. यासाठी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची कंत्राट पद्धतीवर नियुक्ती केली होती. मात्र संक्रमण कमी झाल्याने व्हीएनआयटी व पाचपावली वगळता अन्य केंद्र बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा सुरू करावयाचे झाल्यास यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
कोविड केअर सेंटर
स्थळ- बेड -रुग्ण
पाचपावली -१५० -७०
व्हीएनआयटी २०० -१२५
आमदार निवास ३५० -००