मनपाचा ३१९७ कोटींचा अर्थसंकल्प : ना करवाढ ना घोषणा; उद्दिष्टही घटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 08:23 PM2019-06-26T20:23:55+5:302019-06-26T23:45:29+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी बुधवारी महापालिकेचा सन २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी विशेष सभेत सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी बुधवारी महापालिकेचा सन २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी विशेष सभेत सादर केला. सुुरुवातीची शिल्लक ३९९.८७ कोटींची असून पुढील वित्त वर्षात २७९७.७३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. तर आर्थिक वर्षात ३१९७.३४ कोटींचा खर्च गृहित धरण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना विभागाचे उद्दिष्ट कमी करूनही अर्थसंकल्प मात्र वाढीव रकमेचा आहे. मुख्य आर्थिक स्रोत यावेळीही सरकारी अनुदान आहे. जीएसटी अनुदानाचा वाटा एकूण उत्पन्नाच्या ४५ टक्के आहे.
विशेष म्हणजे महापौर नंदा जिचकार फ्रान्सच्या दौऱ्यावर गेल्याने प्रभारी महापौर दीपराज पार्डीकर यांना सभागृहात प्रदीप पोहाणे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे तीन महिने आचारसंहिता राहणार असल्याने प्रस्तावित विकास कामांना तातडीने मंजुरी घेऊ न ती सुरू करण्याचा संकल्प पोहाणे यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊ स पडण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र घोषणा वा नवीन योजनांचा समावेश नाही. प्रलंबित व सुरू असलेल्या योजना पूर्णत्वास नेण्याचा संकल्प के ला आहे.
गेल्यावर्षी तत्कालीन अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी २९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात २५१.०६ कोटींची भर पडली आहे. तर आयुक्त अभिजित बांगर यांच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ७४५ कोटींनी अधिक आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) संपुष्टात आला आहे परंतु थकबाकीतून ९ कोटी अपेक्षित आहेत. राज्य सरकारकडून जीएसटी व महसुली अनुदानातून १२९८.१४ कोटी मिळतील. मालमत्ताकरापासून ४४३.७० कोटी तर पाणीपट्टीतून १६० कोटींची वसुली अपेक्षित आहे. बाजार विभागाकडून १४.५१ कोटी व स्थावर विभागापासून १५.५० कोटींचा महसूल जमा होईल. नगररचना विभागाकडून ९४.९१ कोटी अपेक्षित आहे. लोककर्म बीओटी प्रकल्पातून ३५ कोटी तर विद्युत विभागामुळे ३०.७५ कोटी मिळण्याची आशा आहे. भांडवली अनुदान स्वरुपात ३०५.२५ कोटी तर भांडवली कर्ज स्वरूपात १९५ कोटी, निरपेक्ष ठेवीच्या माध्यमातून ११२.३५ कोटी गृहित धरण्यात आले आहेत.
रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती व पंडित दीनदयाल उपाध्याय अंतर्गत रस्ते सुधार कार्यक्र मांतर्गत शहरातील रस्ते विकास व सुधारणा कार्यक्रमांसाठी १०४.०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकात्मिक रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत दुसºया व तिसºया टप्प्यातील शिल्लक सिमेंड रोडसाठी २०० कोटी प्रस्तावित आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत विशेष अनुदानातून प्रस्तावित सिमेंट काँक्रिट रस्त्यांसाठी ७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विकास आराखड्यानुसार डी.पी.रोडसाठी १५ कोटी, शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे व डांबरीकरण यासाठी २५.५५ कोटी, नासुप्रतर्फे महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या ५७२ व १९०० अभिन्यासातील विकास कामांसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रकाश विभागाच्या सुधारणासाठी ६५ कोटी, प्रभागातील विकास कामांसाठी ३२.७६ कोटी, खेडे विभागाच्या सुधारणासाठी २० कोटी, शहरातील सोनेगाव, नाईक तलाव व गांधीसागर तलावांच्या विकासासाठी ३२.३२ कोटी, श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवन सभागृह टाऊ न हॉल व कविवर्य सुरेश भट संगीत, साहित्य कला अकादमीसाठी १४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यंत्रसामुग्री खरेदी १० कोटी, भाजी मार्केट व मच्छी मार्के टसाठी १८ कोटी, शहरातील रस्त्यावर असलेले विद्युत खांब हटविण्यासाठी ६७ कोटी, मॉडेल सोलर सिटीसाठी २५ कोटींची तरतूद आहे. नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी ६० कोटी, आॅरेंज सिटी स्ट्रीट आणि मेट्रो मॉलसाठी ६० कोटींची तरतूद केली आहे. बुधवार बाजार महाल, सक्करदरा विकासासाठी २५ कोटींची तरतूद आहे.
अर्थसंकल्प मंजूर करण्याची सूचना सत्तापक्ष नेते संदीप यांनी केली होती. मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. सदस्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी शुक्रवारला चर्चा ठेवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, संदीप सहारे, मो.जमाल, आभा पांडे यांच्यासह विरोधी सदस्यांनी केली. त्यानुसार शुक्रवारी चर्चा घेण्याचा निर्णय कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी घेतला.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
- मालमत्ताकर संदर्भातील तक्रारी व आक्षेपांचा निपटारा १५ जुलै २०१९ पर्यंत करण्याचे निर्देश देणार
- केळीबाग रोड, जुना भंडारा रोड, मॉडल मिल ते रामजी पहेलवान चौक रोड, गड्डीगोदाम उड्डाणपूल, वर्धा रोडवरील उड्डाणपूल, पारडी उड्डाणपुलाच्या कामासाठी जमीन अधिग्रहणासाठी ६७२.४७ कोटींची गरज, अर्थसंकल्पात ११० कोटींची तरतूद
- रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यच्या सहकार्याने १५ ठिकाणी शौचालये उभारणार. परिवहन विभागाच्या बंद बसेसचे रूपांतर ई-शौचालयात करण्यासाठी एक कोटींची तरतूद.
- रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी १०४ कोटी, सिमेंट रोडच्या टप्पा २ व टप्पा ३ साठी २०० कोटी, पहिल्या टप्प्यातील शिल्लक रस्त्यासाठी ७० कोटींची तरतूद.
- रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी २५.५५ कोटींची तरतूद.
- ५७२ व १९०० अभिन्यासातील विकास कामांसाठी २५ कोटी.
- पावसाळी नाल्या बांधकाम व विस्तारासाठी ९ कोटी, नाले बांधकामासाठी ९ कोटी, भूमिगत नाल्यासाठी १० कोटींची तरतूद.
- १३ महापुरुषांच्या प्रतिमा स्थापित करण्यासाठी २.५० कोटी, दहनघाट व क ब्रस्तानच्या विकासासाठी ४.५० कोटींची तरतूद.
- प्रकाश विभागाच्या सुधारणेसाठी ६५ कोटी, वॉर्ड निधीसाठी ३२.७६ कोटी, तलाव संवर्धनासाठी ३२.३२ कोटींची तरतूद.
- स्मार्ट अग्निशामक स्टेशनसाठी ७ कोटी, यंत्रसामुग्री खरेदी १० कोटी तर बाजार विकासासाठी १८ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी ६० कोटींची तरतूद.