मनपा अर्थसंकल्पात आकड्यांचाच खेळ; विरोधकांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:21 PM2019-06-28T22:21:49+5:302019-06-28T22:22:53+5:30

कोणत्याही नवीन योजना नाही. जुन्याच योजनांचा समावेश आहे. त्याही कशा पूर्ण करणार याचे नियोजन नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला पण सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी नाकारली. अर्थसकल्पात जुन्याच योजनांचा समावेश आहे. अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ असून शासकीय अनुदानाचा अर्थसंकल्प असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला, तर अर्थसंकल्प हा आकड्यांचाच असतो, यात सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. शहराच्या विकासाला गती देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचा दावा सत्तापक्षाने केला. वादळी चर्चेनंतर शुक्रवारी महापालिकेच्या विशेष सभेत अर्थसंकल्पाला सूचनासह मंजुरी देण्यात आली.

In NMC budget only game of numbers ; Attack the opposition | मनपा अर्थसंकल्पात आकड्यांचाच खेळ; विरोधकांचा हल्लाबोल

मनपा अर्थसंकल्पात आकड्यांचाच खेळ; विरोधकांचा हल्लाबोल

Next
ठळक मुद्देवादळी चर्चेनंतर अर्थसंकल्पाला मंजुरी : अर्थसंकल्प आकड्यांचाच राहणार असल्याचा सत्तापक्षाचा पलटवार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोणत्याही नवीन योजना नाही. जुन्याच योजनांचा समावेश आहे. त्याही कशा पूर्ण करणार याचे नियोजन नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला पण सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी नाकारली. अर्थसकल्पात जुन्याच योजनांचा समावेश आहे. अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ असून शासकीय अनुदानाचा अर्थसंकल्प असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला, तर अर्थसंकल्प हा आकड्यांचाच असतो, यात सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. शहराच्या विकासाला गती देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचा दावा सत्तापक्षाने केला. वादळी चर्चेनंतर शुक्रवारी महापालिकेच्या विशेष सभेत अर्थसंकल्पाला सूचनासह मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी बुधवारी विशेष सभेत महापालिकेचा सन २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थंसंकल्प मांडला होता. यावर महापालिकेच्या विशेष सभेत वादळी चर्चा झाली.
कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी सभागृहाचे कामकाज पुकारताच भाजपाचे प्रकाश भोयर यांनी चर्चेला सुरुवात केली. अर्थसंकल्पाचे स्वागत करतानाच त्यांनी झोन सभापतींचा निधी ५० लाख करण्याची मागणी केली. अर्थसंकल्पात यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शिवणगाव शहरात आहे. पण अजूनही खेडे आहे. येथे सुविधांचा अभाव असल्याने विकासासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. दक्षिण-पश्चिम नागपुरात एकही अधिकृत बाजार नसल्याने बाजारासाठी जागा उपलब्ध करण्याची सूचना त्यांनी केली.
काँग्रेसचे कमलेश चौधरी म्हणाले, नंदग्राम योजनेचा माजी स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या कार्यकाळापासून अर्थसंकल्पात समावेश केला जातो. परंतु अजूनही ही योजना कागदावर आहे. वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. परंतु लावलेली झाडे जिवंत किती आहेत, असा सवाल करून सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याने याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
भाजपाचे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले. पूर्व नागपूरच्या विकासासाठी अधिक निधी उपलब्ध केल्याने या भागाचा विकास होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
अर्थसंकल्प शासकीय अनुदानावर निर्भर आहे. महापालिका आर्थिक संकटात आहे. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पुरेशी तरतूद नसल्याचा आरोप अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी केली. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासोबतच सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी त्यांनी केली.
काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी पूर्व नागपुरातील पारडी भागात आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी केली. पारडी चौकात संत जगनाडे महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली.
हरीश ग्वालबंशी म्हणाले, अर्थसंकल्प दिशाभूल करणारा आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी होणार नाही. बसपाच्या विरंका भिवगडे यांनी झोन सभापतींचा निधी ५० लाख करण्याची सूचना केली. वैशाली नारनवरे यांनी आसीनगर झोन कार्यालयातील शौचालयाची अवस्था बिकट असल्याचे निदर्शनास आणले.
सिमेंट काँक्रिट रस्त्यामुळे पावसाळ्यात शहरात पाणी साचते. गेल्या वर्षी विधानभवनात पाणी साचले होते. पावसाळी नाल्याची व्यवस्था नाही. शहरातील पावसाळी नाल्या दुरुस्तीचा डीपीआर तयार करण्याची मागणी काँग्रेसचे जुल्फे कार अहमद भुट्टो यांनी केली.
राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे म्हणाले, अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु त्यानुसार निधी उपलब्ध होत नाही. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजनाची गरज आहे. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी अधिक तरतुदीची गरज आहे. माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी सिमेंट रस्त्यांच्या निकृष्ट कामाचा मुद्दा उपस्थित केला. रस्त्यांना भेगा पडल्याने याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच शहरातील सिमेंट रोडच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने ती तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच सक्करदरा तलाव महापालिकेने नासुप्रकडून आपल्या ताब्यात घेऊन याचा विकास करावा, नगररचना विभागाने नकाशे मंजुरीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावे, नरसाळा -हुडकेश्वर भागातील जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली.
काँग्रेसच्या हर्षला साबळे यांनी गांधीसागरजवळ उभारण्यात आलेल्या खाऊ गल्लीचा मुद्दा उपस्थित केला. येथील दुकानाचे वाटप करून सुरू करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या मंगला गवरे यांनी वृक्षारोपण व संवर्धनासाठी अधिक तरतूद करण्याची सूचना केली.

Web Title: In NMC budget only game of numbers ; Attack the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.