मनपा अर्थसंकल्पाला मोठी कात्री लागणार! नवीन आयुक्त सादर करणार सुधारित अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:36 AM2020-01-24T00:36:03+5:302020-01-24T00:40:12+5:30
अर्थसंकल्पातील प्रस्तावित अंदाजानुसार महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होण्याची शक्यता नसल्याचे कारण देत आयुक्तांनी स्थायी समितीच्या बजेटला २५ टक्के कात्री लावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अर्थसंकल्पातील प्रस्तावित अंदाजानुसार महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होण्याची शक्यता नसल्याचे कारण देत आयुक्तांनी स्थायी समितीच्या बजेटला २५ टक्के कात्री लावली आहे. परंतु अर्थसंकल्पात अपेक्षित ३१९७ कोटींच्या तुलनेत २२ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत १६६६ कोटींचाच महसूल जमा झाला आहे. पुढील ६६ दिवसात उर्वरित १५३१ कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता नाही. मार्च २०२० अखेरपर्यंत फार तर २१०० ते २२०० कोटीपर्यत हा आकडा जाण्याची शक्यता विचारात घेता नवीन आयुक्तांकडून २०१९-२० या वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पात मोठी कात्री लावली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू होत आहेत. ते शुक्रवारी वा सोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे मुुंढे महापालिकेचे वास्तव उत्पन्न विचारात घेऊ न सुधारित अर्थसंकल्प सादर करतील, अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्थायी समितीने वित्त वर्षात ५०० कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश, निविदा, प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. खर्चाला २५ टक्के कात्री लावल्याने १२५ कोटींची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे . त्यात पुन्हा कात्री वाढली तर स्थायी समितीने जी कामे मंजूर केली आहेत त्यावर परिणाम होईल. उल्लेखनीय म्हणजे फिक्स प्रायोरिटी, दुर्बल घटक व दिव्यांगांसाठी आरक्षित निधी वगळता अन्य बाबीतील निधीला कात्री लावण्यात आली आहे. ज्या शिर्षकात ७५ टक्के कामे मंजूर करण्यात आली आहे अशा शिर्षकात नवीन कामे घेता येणार नाही. ज्या शिर्षकात ७५ टक्केहून अधिक रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे अशा कामांना ब्रेक लावले आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी वर्ष २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी आयुक्तांनी कपातीचे पत्र जारी केल्याने अर्थसंकल्पाला २५ टक्के कात्री लावली. वित्त वर्ष अखेरीस महापालिका तिजोरीत फार तर २२०० कोटींचा निधी जमा होईल,असा प्रशासनाचा अंदाज असल्यने कात्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.
वसुलीच्या दिवसात उत्पन्नात घट
जानेवारी ते मार्च हे तीन महिने कर वसुलीचे असतात. आर्थिक वर्ष संपण्याला ६६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. वसुलीच्या दृष्टीने या कालावधीत विशेष प्रयत्न होणे अपेक्षित आहे. डिसेंबर महिन्यात मालमत्ता करापासून ४५ कोटी आले होते. मात्र कर्मचारी नसल्याने व डिमांड वाटपाचा घोळ झाल्याने २३ जानेवारीपर्यंत २० कोटी जमा झाले. अखेरच्या तीन महिन्यात वसुली अपेक्षित असताना जानेवारीत कर वसुलीत झालेली घट हा शुभ संकेत नाही.