मनपाचा अनागोंदी कारभार : आरोग्य अधिकाऱ्यांसह १२ अभियंत्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:09 AM2019-09-14T00:09:12+5:302019-09-14T00:11:23+5:30
हॉटमिक्स विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच झोन स्तरावरील कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य विभागाचा प्रस्तावित खर्च व्यय पदातून न दर्शविता आय पदातून दर्शविल्याप्रकरणी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) यांना, तसेच शहरातील नागरिक खड्ड्यामुळे त्रस्त असल्याने स्थायी समितीने निर्देश दिल्यानंतरही खड्ड्याबाबतचा अहवाल सादर केला नाही. यासंदर्भात हॉटमिक्स विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच झोन स्तरावरील कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात आय पदांतर्गत उत्पन्न तर व्यय पदांतर्गत खर्च दर्शविला जातो. त्यानुसार विभाग प्रमुख विविध खर्चाच्या फाईल व्यय पदांतर्गत स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करतात. मात्र आरोग्य विभागाने आय पदांतर्गत खर्चाची फाईल सादर केली. यात स्थायी समिती व आयुक्तांची दिशाभूल केल्याने स्थायी समितीच्या बैठकीत प्रदीप पोहाणे यांनी नाराजी व्यक्त क रून आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
शहरातील नागरिक खड्ड्यामुळे त्रस्त आहेत. याचा विचार करता शहरातील रस्ते दुरुस्ती व खड्ड्याबाबत चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीला हॉटमिक्स विभागाचे कार्यकारी अभियंता व झोन स्तरावरील कार्यकारी अभियांना यांनी माहिती सादर करणे अपेक्षित होते. मात्र कार्यकारी अभियंत्यांनी अद्याप माहिती सादर केली नाही यामुळे या सर्वांना नोटीस बजावून स्थायी समितीच्या पुढील बैठकीत अहवाल व खुलासा सादर करण्याचे निर्देश पोहाणे यांनी दिले.
२५.५४ कोटींच्या कामांना मंजुरी
स्थायी समितीच्या बैठकीत ६.६० कोटींचे प्रशासकीय प्रस्ताव व १८.८४ कोटींच्या विविध कामांच्या निविदा व शासकीय कामांना मंजुरी देण्यात आली. यात सिमेंट काँक्रि ट रोड, पावसाळी नाल्या, रस्ता रुंदीकरण आदी कामांचा समावेश आहे. गेल्या १५ दिवसातील ही स्थायी समितीची तिसरी बैठक असून निवडणूक अचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुन्हा समितीची बैठक होणार आहे. यात महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे.