पाच महिन्यांतच महापालिकेची १०० कोटींची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:12 AM2021-08-28T04:12:25+5:302021-08-28T04:12:25+5:30
टार्गेटपेक्षा १४ कोटींची केली अधिक कमाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या नगररचना विभागाने यंदा पाच महिन्यांतच निर्धारित लक्ष्य ...
टार्गेटपेक्षा १४ कोटींची केली अधिक कमाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या नगररचना विभागाने यंदा पाच महिन्यांतच निर्धारित लक्ष्य पूर्ण करीत रेकाॅर्ड १०० कोटींची कमाई केली. २०२१-२२ या वर्षासाठी विभागाला ८६ कोटी रुपयाचे टार्गेट निश्चित करण्यात आले होते. गेल्या वित्त वर्षात महापालिकेला केवळ ५६ काेटींचीच कमाई झाली होती, हे विशेष.
कोरोनाच्या संकटानंतर बांधकाम क्षेत्र पुन्हा एकदा रुळांवर आले आहे. त्यामुळेच नकाशा मंजुरीसाठी अर्ज वाढू लागले आहेत. सोबतच महापालिकेनेही नकाशा मंजुरीच्या प्रक्रियेला गती दिली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान नगररचना विभागाचे उत्पन्न निर्धारित लक्ष्यापेक्षा १४ कोटी रुपयांनी अधिक राहिले. त्यामुळे स्थायी समितीनेसुद्धा विभागाचे कौतुक केले आहे. नगररचना विभागाच्या उत्पन्नाचा आढावा घेण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी शुक्रवारी बैठक बोलावली होती. बैठकीत भोयर यांनी पुढील सात महिन्यांत नगररचना विभागाला २१९ कोटी रुपयांचे लक्ष्य ठरवून दिले. आता २०२१-२२ चे सुधारित लक्ष्य ३१० कोटी रुपये करण्यात आले आहे. हे वाढीव लक्ष्यसुद्धा विभाग सहजपणे पूर्ण करील, असा विश्वासही व्यक्त केला. तसेच प्रलंबित नकाशे तातडीने मंजूर करावेत; जेणेकरून नागरिकांची कामे लवकर होतील आणि महापालिकेचे उत्पन्नही वाढेल, असेही सांगितले. बैठकीत नगररचनाकार हर्षल गेडाम, विभागाचे उपअभियंता, आदी उपस्थित होते.
-बॉक्स
-गुंठेवारी लेआऊटमधून २१ कोटींची कमाई
गुंठेवारी अंतर्गत येणाऱ्या लेआऊटमधील नकाशे मंजुरीचे अधिकार नागपूर सुधार प्रन्यासकडे पुन्हा हस्तांतरित करण्यात आले आहेत. यानंतरही महापालिकेला गुंठेवारी लेआऊटच्या माध्यमातून २१ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
-बॉक्स
- सर्वाधिक कमाई जूनमध्ये
कोरोनाच्या संकटात एप्रिल महिन्यात ८.४५ कोटींचे उत्पन्न मिळाले; परंतु कोरोनाचे संकट कमी होताच उत्पन्नही वाढू लागले. मे महिन्यात १६.४१ कोटी, जून महिन्यात २६.८ कोटी, जुलैमध्ये २६ कोटींची कमाई झाली.. २०१९-२० मध्ये १९३ कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते; परंतु केवळ ५६ कोटींची कमाई झाली. कोरोनाचा सर्वाधिक फटका या विभागाला बसला.