माजी महापौर तिवारींना बालपांडेंची अडचण, विरोधी पक्षनेते वनवे 'सेफ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 01:33 PM2022-06-01T13:33:35+5:302022-06-01T14:07:08+5:30
माजी महापौर दयाशंकर तिवारी व माजी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे एकाच प्रभागात आल्याने नेमकी कुणाची बाजू घ्यायची, असा पेच भाजपपुढे आहे. माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचा प्रभाग सुरक्षित आहे.
नागपूर : तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. या सोडतीत बहुतांश नगरसेवकांना दिलासा मिळाला असून, त्यांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. माजी महापौर दयाशंकर तिवारी व माजी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे एकाच प्रभागात आल्याने नेमकी कुणाची बाजू घ्यायची, असा पेच भाजपपुढे आहे. माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचा प्रभाग सुरक्षित आहे.
काही ठिकाणी एकाच पक्षाचे दोन नगरसेवक एकाच प्रभागात आल्याने त्यांना स्वपक्षातच तिकिटासाठी लढावे लागणार आहे. भाजपचे संदीप गवई, प्रमोद तभाने, अर्चना पाठक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपचे माजी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम हजारे, सतीश होले, संदीप सहारे, मनोज सांगोळे, रमेश पुणेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे, आभा पांडे यांचाही लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुमेरियांशी कोण भिडणार, कुकडे की झलके?
शिवसेनेचे महानगर प्रमुख, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांचे कार्यक्षेत्र प्रभाग २९ व प्रभाग ४९ मध्ये आहे. प्रभाग २९ मध्ये परिवहन समितीचे माजी सभापती बंटी कुकडे यांचा जुना प्रभाग जोडण्यात आला आहे. तर, प्रभाग ४९ मधून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष पिंटू झलके लढण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही प्रभागांत भाजप-सेना यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे.
काहींना घुसखोरीशिवाय पर्याय नाही
कुमेरियांशी कोण भिडणार याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेच्याआरक्षण सोडतीत काही माजी पदाधिकाऱ्यांना धक्का बसला, तर काहींना बाजूच्या प्रभागात घुसखोरीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरेश भट सभागृहात १५६ पैकी ७८ जागांसाठी महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीत काही माजी पदाधिकाऱ्यांना धक्का बसला, तर काहींना बाजूच्या प्रभागात घुसखोरीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या २३ क्रमांकाच्या प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गात दोन महिला व एक पुरुष असे आरक्षण निघाले आहे. जुन्या चार सदस्यीय प्रभागात दयाशंकर तिवारी व माजी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे निवडून आले होते. आता एकच जागा सर्वसाधारण असल्याने तिवारी किंवा बालपांडे यापैकी एकाला स्वत:चा प्रभाग सोडून इतरत्र लढावे लागणार आहे. या दोघांत कोण हा प्रभाग सोडतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांना प्रभाग ३० मध्ये लढण्याची संधी आहे. जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांचा प्रभाग ४३ मधील दोन जागांपैकी एक अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाल्याने गवई यांच्या अडचणी वाढल्या आहेत, तर क्रीडा समितीचे माजी सभापती प्रमोद तभाने यांच्या प्रभाग ४० मधील दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने तभाने यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. गेल्यावेळी काँग्रेसचे तिकीट कटलेले माजी नगरसेवक अरुण डवरे यांना यावेळी प्रभाग १६ मध्ये संधी आहे.
संदीप जोशींकडे लक्ष
माजी महापौर संदीप जोशी यांनी महापालिका निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र, आरक्षण सोडतीत त्यांच्या प्रभाग ४१ मध्ये दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने लढण्याचा मार्ग मोकळा आहे. ते आपला निर्णय फिरवतात की कायम ठेवतात, याकडे लक्ष लागले आहे. याच प्रभागातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर लढण्याची शक्यता आहे.
संगीता गिऱ्हे की अर्चना पाठक?
नव्या प्रभाग रचनेत प्रभाग १८ मध्ये भाजपच्या नगरसेविका संगीता गिऱ्हे व अर्चना पाठक या दोघींमध्ये तिकिटासाठी स्पर्धा होईल. या प्रभागात सर्वसाधारण महिलांसाठी एकच जागा राखीव झाली आहे. गिऱ्हे या ज्येष्ठ असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. मात्र, पाठक या उत्तर भारतीय असल्याने त्यांना डावलणेही भाजपसाठी सोयीचे नाही. भाजपचे माजी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांच्या प्रभाग ५२ मध्ये एक जागा सर्वसाधारण असल्याने ठाकरे यांना अडचण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या प्रभाग २७ मध्ये दोन महिला व एक जागा सर्वसाधारण असल्याने पेठे यांचा मार्ग मोकळा आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांना प्रभाग १ मधून सर्वसाधारण प्रवर्गातून लढण्याला संधी आहे.
सर्वसाधारणने अनेकांना तारले
मनपातील १५६ जागांपैकी ७८ जागा महिलांसाठी राखीव असल्या तरी तीन सदस्यीय प्रभागात एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने अनेकांना तारले आहे. मात्र, एकाच जागेसाठी अनेक इच्छुक असल्याने उमेदवारीसाठी आपसातच जोरदार रस्सीखेच होणार आहे.