मनपा कर्मचाऱ्याने इमारतीवरून घेतली उडी
By admin | Published: November 30, 2014 12:55 AM2014-11-30T00:55:55+5:302014-11-30T00:55:55+5:30
महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्स मुख्यालय स्थित नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या छतावरून मनपाच्या एका लिपिकाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजता घडली.
मनपा मुख्यालयातील घटना : घटनास्थळीच मृत्यू
नागपूर : महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्स मुख्यालय स्थित नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या छतावरून मनपाच्या एका लिपिकाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजता घडली.
पुंडलिक सुपारे (५०) रा. सावरबांधे ले-आऊट हुडकेश्वर असे मृताचे नाव आहे. मनपातील सूत्रानुसार मृत मागील १९ वर्षांपासून मनपा मुख्यालयाच्या जुन्या इमारतीतील पहिल्या माळ्यावरील लेखा विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सहा वर्षांपूर्वी त्यांना बढती मिळाली. सध्या ते धरमपेठ बोले पेट्रोल पंपाजवळील जलप्रदाय विभागात उच्च श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी १० वाजता धरमपेठ येथील कार्यालयात पोहोचले. हजेरी लावल्यानंतर सिव्हिल लाईन्स मुख्यालयात काही काम असल्याचे सांगून ते कार्यालयाबाहेर पडले. येथील त्यांच्या जुन्या कार्यालयामागे नवीन प्रशासकीय इमारत आहे. या नवनिर्मिती प्रशासकीय इमारतीच्या गच्चीवर ते पोहोचले. त्यांना जाताना अनेकांनी पाहिले. सकाळची वेळ होती. नुकतेच कार्यालय सुरू झाले असल्याने अनेकजण उपस्थित होते. सुपारे यांनी अग्निशमन विभागाच्या बाजूने वरून उडी घेतली. खाली पडताच ते रक्तबंबाळ झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सुपारे खाली पडताच उपस्थित लोक त्यांच्या दिशेने धावले.
अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी मेयोला पाठविला.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.मृत सुपारे हे धार्मिक स्वभावाचे होते. ते हनुमानाचे भक्त होते. ते शनिवारी उपवास ठेवायचे. नेहमीप्रमाणे वस्तीतील हनुमान मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी थोडा फराळ केला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ते आॅफिससाठी रवाना झाले. ते सर्वांशी हसतमुखाने वागायचे. १४ डिसेंबर रोजी त्यांच्या बहिणीच्या मुलीचे लग्न आहे. लग्नाच्या तयारीसंबंधात घरी चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)
विधानभवनासमोरील इमारतीवर चढण्याचा प्रयत्न
सुपारे यांच्या आत्महत्येप्रकरणी मनपा कार्यालयात सुरू असलेल्या चर्चेनुसार सुपारे यांना जलप्रदाय विभागातून मुख्यालयात बदली हवी होती. त्यावरून ते तणावात होते. तर काही जण म्हणतात की ते मागील काही दिवसांपासून तणावात असल्याचे दिसून येत होते. मनपा प्रशासकीय इमारतीत येण्यापूर्वी त्यांनी विधानभवनासमोरील बहुमजली इमारतीवर चढण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. त्यामुळे ते मनपा परिसरात आले.
कुटुंबीय मानसिक धक्क्यात
मृत सुपारे यांच्या कुटुंबात पत्नी वनिता आणि दोन मुले आहेत. त्यांची मोठी मुलगी नेहा (२०) पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तर मुलगा शुभम (१८) बारावीत आहे. पुंडलिक यांनी या पद्धतीने केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.