मनपाकडे दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:01 AM2021-03-09T00:01:30+5:302021-03-09T00:02:29+5:30
NMC, stocks of vaccine कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्यातुलनेत लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही. सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे सुमारे १८ ते १९ हजार डोजचा साठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्यातुलनेत लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही. सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे सुमारे १८ ते १९ हजार डोजचा साठा आहे. रोज १० हजार डोज लागत असल्याने पुढील दोन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. यामुळे राज्याकडे सुमारे अडीच लाख डोजची मागणी केली आहे. ग्रामीण भागात तर त्याहून विचित्र स्थिती आहे. केवळ ५ हजार डोज शिल्लक आहेत.
तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात होताच लसीकरण केंद्रावर गर्दी उसळली आहे. लसीकरणाची वेळ व केंद्रांची संख्या वाढविल्याने याचा फायदा लाभार्थ्यांना होत आहे. सध्या १८ शासकीय व ३७ खासगी केंद्रावर लसीकरण सुरू आहे. रोज साधारण १० हजाराच्या जवळपास लस दिली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यासाठी ‘कोविशिल्ड’चे ३५,६००, दुसऱ्या टप्प्यासाठी ३८,५००, तर तिसऱ्या टप्प्यासाठी ४९,५०० डोज असे एकूण १,२३,६०० डोज आले. यातून किती वापरले गेले आणि किती शिल्लक, याची माहिती अधिकारी द्यायला तयार नाही. परंतु सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे १८ ते १९ हजार डोज तर ग्रामीणमध्ये ५ हजार डोज शिल्लक असल्याचे अधिकारी सांगतात. रोजच्या लसीकरणाचा आकडा पाहता हे डोज पुढील दोन दिवसात संपणार आहे. यामुळे महानगरपालिकेने अडीच लाख डोजची मागणी राज्याकडे केल्याची माहिती आहे. याला मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दुजोरा दिला आहे.
शुक्रवारपर्यंत लसीचा साठा येईल
महानगरपालिकेकडे १८ हजारांवर डोजचा साठा आहे. याशिवाय विविध केंद्रावर डोज उपलब्ध आहेत. गरज पडल्यास ग्रामीणमधून डोज मागितल्या जातील. शिवाय, शुक्रवारपर्यंत लसीचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे. यामुळे तुटवडा पडण्याची शक्यता नाही.
- डॉ. संजय चिलकर
आरोग्य अधिकारी, मनपा