विरोधाला न जुमानता अतिक्रमणाचा सफाया; एकाचवेळी विविध पथकांद्वारे झोननिहाय कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 05:20 PM2022-06-29T17:20:48+5:302022-06-29T17:21:09+5:30
पथकांनी वेगवेगळ्या झोनमध्ये अतिक्रमण विरोधात मोहीम राबविली.
नागपूर : मनपा आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नियोजनानुसार शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात आणि फुटपाथवरील अतिक्रमणाविरोधात मंगळवारपासून कारवाई सुरू केली. मनपाच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने हनुमाननगर झोन क्षेत्रातील नंदनवन रोडवरील कीर्ती अपार्टमेंटलगत अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता येथील अतिक्रमण हटविले. तसेच शहरातील अन्य भागातही ही मोहीम राबविली.
पथकाने मानेवाडा चौक ते तुकडोजी पुतळा चौक दरम्यानचे अतिक्रमण हटविले. यावेळी एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर पथक नंदनवन रोडवरील कीर्ती अपार्टमेंट येथे पोहोचले. फुटपाथवरील काउंटर हटविण्यात आले. अतिक्रमण करणाऱ्यांनी कारवाईला विरोध केल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावून कारवाई करण्यात आली. पथकांनी वेगवेगळ्या झोनमध्ये अतिक्रमण विरोधात मोहीम राबविली.
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत आठ रास्ता चौक ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक दरम्यानचे अतिक्रमण हटविले. दोन ठेले जप्त करण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, व्हीसीए मैदान ते सिव्हिल लाईन कार्यालय दरम्यानचे अतिक्रमण हटविण्यात आले. धंतोली झोनअंतर्गत मेडिकल ते वंजारी नगर, रामेश्वरी रोड ते शताब्दी चौक ते ओंकार नगर चौक दरम्यानचे ३२ अतिक्रमण हटविले. तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. सतरंजीपुरा झोनअंतर्गत मारवाडी चौक ते शांतीनगर घाट, कापड मार्केट दरम्यानचे २६ अतिक्रमण हटवून दोन ट्रक साहित्य जप्त केले.
अनधिकृत बांधकाम तोडले
नेहरूनगर झोनअंतर्गत नंदनवन येथील प्लॉट क्रमांक १४८५ मध्ये पार्किंग जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. झोन कार्यालयाने या संदर्भात नोटीस बजावली होती. पथकाने अनधिकृत बांधकाम पाडून ५ हजार रुपये दंड वसूल केला.