नागपुरात येणार १४५ एसी एलेक्ट्रीक बस; १५ ऑगस्टपर्यंत मिळणार १५ बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 03:07 PM2022-06-03T15:07:45+5:302022-06-03T15:18:26+5:30
महापालिकेच्या परिवहन विभागाने हरयाणाच्या पी.एम.आय कंपनीला १४५ इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याचे कार्यादेश दिले आहेत. करारानुसार १५ बसेसचा पुरवठा १५ ऑगस्टपर्यंत तर उर्वरित बसेसचा पुरवठा डिसेंबर २०२२ पर्यंत होणार आहे.
नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाने हरयाणाच्या पी.एम.आय. कंपनीला १४५ इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याचे कार्यादेश दिले आहेत. करारानुसार १५ बसेसचा पुरवठा १५ ऑगस्टपर्यंत, तर उर्वरित बसेसचा पुरवठा डिसेंबर २०२२ पर्यंत होणार आहे.
मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त रवींद्र भेलावे आणि कंपनीचे उपाध्यक्ष संजय नागपाल यांनी कार्यादेशाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना उपस्थित होते. मनपातर्फे पर्यावरणपूरक बसेसवर भर देण्यात येत आहे. परिवहन विभागाच्या प्रस्तावानुसार २०२२-२३ पर्यंत १०४.९२ कोटी निधीमधून २३३ मिडी बसेस खरेदी करणे प्रस्तावित आहे. २०२१-२२ पर्यंत प्राप्त ७७.५२ कोटींमधून पहिल्या टप्प्यात ११५ इलेक्ट्रिक बसेस वेटलिजवर खरेदी करण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीतून अंदाजे १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.
पी. एम. आय. कंपनीने चार वर्षांपूर्वी हरयाणामध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या निर्मितीचा कारखाना उभारण्यात आला असून, या प्रकल्पाची क्षमता १५०० बस उत्पादन करण्याची आहे.
बैठक क्षमता ३० सीट्सची
नागपुरात दाखल होणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित राहणार आहेत. या बसेसची बैठक क्षमता ३० सीट्सची असून १५ प्रवासी उभे राहू शकतात. यामध्ये एल. एम. ओ. बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. सिंगल चार्जिंगवर १५० किमीपर्यंत बस धावू शकते, अशी माहिती संजय नागपाल यांनी दिली. यावेळी प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे उपस्थित होते.