तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 11:12 AM2021-12-30T11:12:03+5:302021-12-30T11:24:00+5:30

सध्या नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा गाजत आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील हा घोटाळा आहे

nmc stationery scam : bjp demanding enquiry over tukaram mundhe | तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर

तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर

Next
ठळक मुद्देविनापरवानगी कंत्राटदाराला २० कोटी दिल्याचा आरोप स्मार्ट सिटीतील अनियमितता

नागपूर : महापालिकेचे माजी आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याच्या आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे. संबंधित चौकशी अहवाल संचालक मंडळाला सादर करण्यात आला असून आता त्यावर मंडळाला निर्णय घ्यायचा आहे. मात्र, या अहवालात नेमका काय निष्कर्ष काढण्यात आला, याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे.

तुकाराम मुंढे यांनी सीईओ पदाची सूत्रे नियमबाह्य स्वीकारली होती. मात्र चेअरमन यांनीच पदभार सोपविल्याचा दावा मुंढे यांनी केला होता. त्यांनी संचालक मंडळाची परवानगी न घेता ठेकेदारांना २० कोटींचे बिल दिल्याचा मुद्दा माजी महापौर संदीप जोशी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला होता. याची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीत काय निष्पन्न झाले, याची अधिक माहिती देता येणार नाही, असे स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

मार्च २०२३ पर्यंत स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. केंद्राने निर्धारित केलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी कामांना गती दिल्याची माहिती भुवनेश्वरी एस. यांनी दिली. प्रकल्पात येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न आहे. ५६ कि.मी.पैकी १२ कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रकल्प आधीच पूर्ण झाला आहे. घरकुल योजनेची १० मजली इमारत उभारली जात आहे. यातील तीन मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. येथे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

जमीन मालकांना ६०:४० चा फार्म्युला मान्य नाही. यामुळे प्रकल्पात अडचणी येत आहेत. प्रकल्पगस्तांच्या शंका दूर करून कामाला गती देण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्पासाठी नासुप्रकडून लवकरच जमीन मिळणार असल्याचे भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले.

- मार्च २०२३ पर्यंत स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण करणार

- ५६ कि.मी.पैकी १२ कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण

- प्रकल्पग्रस्तांसाठी १० मजली इमारत उभारणार

Web Title: nmc stationery scam : bjp demanding enquiry over tukaram mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.