मनपाकडून ‘श्वानदंश’ आकडेवारीचा ‘झोलझाल’; दोन माहिती अधिकारातील आकड्यांमध्ये तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 04:24 PM2022-02-21T16:24:01+5:302022-02-21T16:28:10+5:30

२०२० व २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे.

nmc statistics of number of dog bites is more than its showing on the records | मनपाकडून ‘श्वानदंश’ आकडेवारीचा ‘झोलझाल’; दोन माहिती अधिकारातील आकड्यांमध्ये तफावत

मनपाकडून ‘श्वानदंश’ आकडेवारीचा ‘झोलझाल’; दोन माहिती अधिकारातील आकड्यांमध्ये तफावत

Next
ठळक मुद्देएकाच कालावधीतील दंशांच्या आकड्यात ६७ टक्क्यांचा फरक

योगेश पांडे

नागपूर : उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून, शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र भटक्या श्वानांच्या दंशाच्या आकडेवारीचा खेळ सुरूच ठेवला आहे.

मनपानेच अवघ्या सव्वा वर्षात २०१९-२० सालच्या स्वत:च्याच आकडेवारीत हेराफेरी केली असून, श्वानदंशांची संख्याच कमी दाखविण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२० व २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी काही दिवसाअगोदर माहिती अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. २०१९-२० सालापासून किती नागरिकांना भटक्या श्वानांचा दंश झाला हे त्यांनी विचारले होते. याअगोदर याचसंदर्भात २०२० मध्येदेखील मनपाने माहितीच्या अधिकारात माहिती दिली होती. दोन्ही माहिती अधिकारात मनपाच्या आरोग्य विभागाने श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी दिली आहे. मनपाने यंदा दिलेली आकडेवारी ही २०२० च्या आकडेवारीपासून पूर्णत: वेगळी आहे. दोन्ही आकड्यांत तब्बल ११ हजार ५५० इतक्या दंशांची तफावत आहे. विशेष म्हणजे श्वानदंशांच्या आकड्यात वाढ झाली नसून घट झाली आहे. मनपाने नेमके आकडेवारीतील गणित का बिघडविले व श्वानदंश झालेल्या नागरिकांची नेमकी संख्या किती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मनपाचे अंकगणित की दिशाभूल?

जुन्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत नागपुरातील १७ हजार २५१ नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला होता. मात्र माहिती अधिकारातील नवीन आकडेवारीनुसार याच कालावधीत श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी ही अवघी ५७०१ इतकी दाखविण्यात आली आहे. श्वानदंशाच्या रुग्णांची आकडेवारी वाढू शकते. मात्र ही संख्या कमी करण्याचे ‘मॅजिक’ मनपाने केले आहे. यामागे मनपाचे अंकगणित आहे, की दिशाभूल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकी खरी माहिती कोणती?

माहितीच्या अधिकारांतर्गत नेमकी व अचूक माहिती असणे अपेक्षित असते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून एकाच कालावधीत झालेल्या संपूर्ण शहरात भटक्या श्वानांच्या दहशतीबाबत वेगवेगळी माहिती देण्यात येत असेल तर हा संभ्रम निर्माण करणारा प्रकार आहे.

Web Title: nmc statistics of number of dog bites is more than its showing on the records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.