सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलमध्ये पोहोचले महापालिकेचे पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:52 PM2018-04-19T23:52:33+5:302018-04-19T23:53:04+5:30
सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलच्या इमारतीच्या बांधकामाबाबत वाढत्या दबावात गुरुवारी महापालिकेचे पथक सेमिनरी हिल्स येथील बांधकामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. दरम्यान त्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे बांधकामाशी निगडित कागदपत्र मागितले. पथकात सहभागी अधिकाऱ्यांनुसार शाळा व्यवस्थापन कोणतेच कागदपत्र देऊ शकले नाही. शाळा प्रशासनाकडून इमारतीचा मंजूर आराखडा व नकाशासह इतर कागदपत्र न मिळाल्यामुळे शाळेला नोटीस जारी करून बांधकाम थांबविण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलच्या इमारतीच्या बांधकामाबाबत वाढत्या दबावात गुरुवारी महापालिकेचे पथक सेमिनरी हिल्स येथील बांधकामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. दरम्यान त्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे बांधकामाशी निगडित कागदपत्र मागितले. पथकात सहभागी अधिकाऱ्यांनुसार शाळा व्यवस्थापन कोणतेच कागदपत्र देऊ शकले नाही. शाळा प्रशासनाकडून इमारतीचा मंजूर आराखडा व नकाशासह इतर कागदपत्र न मिळाल्यामुळे शाळेला नोटीस जारी करून बांधकाम थांबविण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
निरीक्षण पथकाचे नेतृत्व करणारे महापालिकेच्या धरमपेठ झोनचे उप अभियंता नितीन झाडे यांनी या बातमीची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या त्यांना इमारतीचे सुरु असलेले बांधकाम नियमानुसार दिसले नाही. निरीक्षणादरम्यान शाळा व्यवस्थापनाला कागदपत्र मागण्यात आले होते. परंतु ते मिळाले नाहीत. उल्लेखनीय म्हणजे सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलबाबत ‘लोकमत’ने अनेक खुलासे केले आहेत. या खुलाशामुळे डोळे बंद केलेले महापालिकेचे अधिकारी जागे झाले होते. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण शांत करण्यासाठी नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांनी २७ मार्च २०१८ रोजी सहायक आयुक्तांना पत्र लिहून शाळेचे निरीक्षण करण्यास सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली नाही. दरम्यान ‘लोकमत’मध्ये सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलबाबत एक आणखी खुलासा केल्यानंतर काही दिवसापूर्वी शाळेचे मुख्याध्यापक/व्यवस्थापनाला नोटीस जारी केली होती. नोटीसमध्ये शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचा नकाशा व परवानगी व शाळेच्या मालकी हक्काशी निगडित कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते.
नोटीस देऊन विसरले
महापालिकेने या शाळेला नोटीस दिल्यानंतर महापालिकेला या नोटीसचा विसर पडला. शाळा व्यवस्थापनानेही नोटीसनुसार महापालिकेला कागदपत्र सोपविले नाहीत. उलट कामाची गती वाढविली. गुरुवारी ‘लोकमत’ने नवा खुलासा केल्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झोन अधिकारी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. त्यानंतर आज महापालिकेच्या पथकाने शाळेचा दौरा केला. सोबतच कागदपत्रांची मागणीही केली.
काम अद्यापही सुरू आहे
सूत्रांनुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर व संकटानंतरही शाळेच्या व्यवस्थापनाने बांधकाम सुरुच ठेवले आहे.
तर बांधकाम थांबणार
धरमपेठ झोनचे उपअभियंता नितीन झाडे यांनी सांगितले की, त्यांनी शाळेला कागदपत्र तात्काळ सादर करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. शुक्रवारपर्यंत कागदपत्र न मिळाल्यास एमआरटीपी अॅक्ट कलम ५४ नुसार शाळेला नोटीस देऊन बांधकाम थांबविण्याचे निर्देश देण्यात येतील.