मनपा : कामाचे ऑडिट न करताच निविदा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 09:43 PM2021-06-15T21:43:53+5:302021-06-15T21:44:15+5:30
NMC Tender issue शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यात पावसाळा सुरू झाला असताना विद्यार्थ्यांचा इन्स्टा रोड पॅचर मशीनव्दारे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी दोन कोटीच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यात पावसाळा सुरू झाला असताना विद्यार्थ्यांचा इन्स्टा रोड पॅचर मशीनव्दारे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी दोन कोटीच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी इन्स्टा रोड पॅचर मशीनच्या साहाय्याने रस्त्यांची दुरुस्नी करण्यात आली होती. परंतु काही दिवसानंतर त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याच्या तक्रारी आहेत. असे असतानाही मशीनव्दारे करण्यात आलेल्या कामाचे ऑडिट न करता प्रस्तावाला मंजुरी दिल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. तो मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिली. मशीनच्या कामाचे ऑडिट करण्यात आलेले नाही. यासंदर्भात प्रशासनानेही आक्षेप नोंदविला नाही. परंतु कामाचा दर्जा चांगला नसल्यास यावर नजर ठेवली जाईल. यात अनियमितता आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई केली जाईल. या मशीनच्या माध्यमातून पावसाळ्यातही खड्डे बुजवणे शक्य होत असल्याचा दावा आहे.
उद्यानालगत उभारणार एसटीपी
शहरातील उद्यानालगत वाहणाऱ्या १२ नाल्यावर सिरेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्याच्या निविदांना मंजुरी दिल्याची माहिती भोयर यांनी दिली. याचे लवकरच कार्यादेश काढले जातील. या प्रकल्पामुळे नाल्यातील उपलब्ध पाण्यावर प्रक्रिया करून ते उद्यानासाठी वापरले जाईल. ४ जानेवारी २०२१ रोजी या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यावर १२ टक्के जीएसटीसह १.१४ कोटीचा खर्च अपेक्षित आहे.
मोबाईलवर ५० लाख खर्च
मनपातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या मोबाईल बिलावर ३ वर्षासाठी ५० लाख रुपये खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली. आयुक्तांनी या प्रस्तावाला आधीच मंजुरी दिली आहे. नोंदीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. प्रति मोबाईल कनेक्शन १४९ रु. मंजूर करण्यात आले आहे. यावर जीएसटी वेगळा राहील.