Nagpur | आता शहरातील गटारांची यांत्रिक साफसफाई; दाखल झाले तीन रोबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 03:59 PM2022-10-15T15:59:27+5:302022-10-15T16:03:03+5:30
या प्रकल्पावर स्मार्ट सिटी व मनपा मिळून काम करीत आहे.
आशिष रॉय
नागपूर : महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांना आता मॅनहोलमध्ये प्रवेश करावा लागणार नाही. नागपूर स्मार्ट सिटी ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मॅनहोलची सफाई करण्यासाठी तीन रोबोट भाड्याने घेतले आहेत. हा पायलट प्रकल्प आहे. समाधानकारक यश मिळाल्यास महानगरपालिका अधिक रोबोट भाड्याने घेण्याची मागणी करेल. रोबोटच्या कामाला या महिन्यापासून सुरुवात होईल.
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपाकडे मॅनहोलची सफाई करण्यासाठी सक्शन मशीन आहे. परंतु, या मशीनद्वारे अरुंद मॅनहोलची सफाई करता येत नाही. हे रोबोट अशा मॅनहोलची सफाई करतील. याकरिता जेनरोबोटिक्स कंपनीला प्रत्येक रोबोटसाठी कमाल सात लाख रुपये महिना भाडे दिले जाईल.
रोबोट एक महिन्यात किती मॅनहोलची स्वच्छता करते, यावर भाडे अवलंबून राहील. हे स्वच्छ भारत मिशनच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. रोबोटला कॅमेरा व हात आहेत. ते बादलीने मॅनहोल स्वच्छ करतील. या रोबोटने यावर्षीचा स्वच्छता स्टार्ट-अप चॅलेंज अवॉर्ड जिंकला आहे. या प्रकल्पावर स्मार्ट सिटी व मनपा मिळून काम करीत आहे.