मनपाला सांड पकडणाऱ्या पथकाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 09:03 PM2019-09-30T21:03:15+5:302019-09-30T21:05:35+5:30
सांडांना सहजासहजी पकडता येत नाही. सांड बिथरल्यास नुकसान होण्याचाही धोका असतो. याचा विचार करता तामिळनाडू येथील पथकाला शहरातील सांड पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मोकाट जनावरात सांडांचाही समावेश आहे. कोंडवाडा विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोकाट गाई, म्हशींना पकडणे शक्य होते. परंतु सांडांना सहजासहजी पकडता येत नाही. सांड बिथरल्यास नुकसान होण्याचाही धोका असतो. याचा विचार करता तामिळनाडू येथील पथकाला शहरातील सांड पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. सोमवारी हे पथक येणार होते. परंतु आले नाही. एक-दोन दिवसात पथक नागपुरात येण्याची अपेक्षा आहे.
मोकाट गाई व म्हशींना पकडणे सोपे असते. सांड सहजासहजी नियंत्रणात येत नाही. त्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक असते. तामिळनाडूतील आर. राजकुमार यांचे पथकासोबत सांड पकडण्याचा करार करण्यात आला आहे. प्रतिसांड २ हजार ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. १० जणांचे पथक नागपुरात लवकरच दाखल होणार आहे.
यापूर्वी २०१३ मध्ये सांड पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी गोपालकांनी विरोध केल्याने मोहीम राबविणे शक्य झाले नव्हते. याचा विचार करता सांड पकडण्यासाठी शहर पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात पोलिसांना पत्र दिले असून कोंडवाडा विभागाने बंदोबस्ताची मागणी केली आहे.
नागपूर शहरात सुमारे २५० सांड आहेत. सांड पकडल्यास इतर जनावरांना नियंत्रण घालणे शक्य होईल. सांड पकडताना तो बिथरण्याची शक्यता गृहित धरून या भागातील वाहतूक काही वेळ बंद ठेवावी लागणार आहे. तसेच गोपालकांचा या कारवाईला विरोध होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्ताची गरज भासणार आहे. मानकापूर परिसरातून सांड पकडण्याला सुरुवात के ली जाणार आहे.
पकडलेले सांड शहरापासून दूरवर असलेल्या गोरक्षण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. सांड पकडणारे पथक सोमवारी येणार होते. परंतु ते आले नाही. पुढील एक-दोन दिवसात पथक नागपुरात येण्याची अपेक्षा असल्याची माहिती पशुचिकि त्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
निवडणुकीमुळे पोलीस बंदोबस्ताची अडचण
विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागणार आहे. अशा परिस्थितीत सांड पकडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळताना अडचण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशावेळी वाहतूक पोलिसांची मागणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.