मनपा : वित्त अधिकारी व निगम सचिव कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:36 AM2020-09-27T00:36:29+5:302020-09-27T00:38:07+5:30
महापालिकेत निगम सचिव आणि प्रमुख लेखा व वित्त अधिकारी ही पदे महत्त्वाची आहेत. परंतु ‘अ’ वर्गात समावेश असलेल्या नागपूर मनपात ही दोन्ही पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. अद्याप पूर्णवेळ अधिकारी मिळालेले नाहीत. अतिरिक्त प्रभारामुळे नगरसेवक व कर्मचारी त्रस्त असून त्यांना या पदावर पूर्ण वेळ अधिकारी कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत निगम सचिव आणि प्रमुख लेखा व वित्त अधिकारी ही पदे महत्त्वाची आहेत. परंतु ‘अ’ वर्गात समावेश असलेल्या नागपूर मनपात ही दोन्ही पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. अद्याप पूर्णवेळ अधिकारी मिळालेले नाहीत. अतिरिक्त प्रभारामुळे नगरसेवक व कर्मचारी त्रस्त असून त्यांना या पदावर पूर्ण वेळ अधिकारी कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे.
प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे सेवानिवृत्त झाल्यानंतर अनंत मडावी यांचे काही महिने वगळता हे पद रिक्तच आहे. या पदाचा अतिरिक्त प्रभार उपायुक्त नितीन कापडणीस, मुख्य लेखा परीक्षक मोना ठाकूर, आमोद कुंभोजकर, उपायुक्त निर्भय जैन आदींनी सांभाळला आहे. सध्या नासुप्रचे वित्त व लेखा अधिकारी हेमंत ठाकरे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार आहे. त्यांची अमरावतीला बदली झाली आहे. सध्या ते दोन्ही ठिकाणचा पदभार सांभाळून आपले कौशल्य पणाला लावत आहेत.
वित्त विभागात कामे होत नसल्याबाबत नगरसेवक व कंत्राटदारांच्या तक्रारी आहेत. वर्षानुवर्षे फायली प्रलंबित असल्याने विकास कामांना फटका बसला आहे. काही मर्जीतील कंत्राटदार वगळता इतरांना बिलासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
मनपात निगम सचिवाचे पद महत्त्वाचे समजले जाते. परंतु हरीश दुबे सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदाचा कारभार प्रभारी सांभाळत आहेत. उपायुक्त रंजना लाडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार होता. परंतु सभागृहात उपस्थित तांत्रिक मुद्यांना उत्तरे देताना प्रशासनाला नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे उपायुक्त सुभाषचंद्र जयदेव यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र काही महिन्यापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर पुन्हा लाडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार आला. सध्या त्या रजेवर असल्याची माहिती आहे.
निवृत्त निगम सचिवांच्या चकरा
निवृत्त निगम सचिव हरीश दुबे यांची पुन्हा या पदावर वर्णी लावण्याचे सत्तापक्षातील काही वजनदार नगरसेवकांनी त्यांना आश्वासन दिले आहे. या आश्वासनानुसार नियुक्तीपूर्वीच दुबे अधूनमधून मनपातील निगम सचिवांच्या कक्षात बसून विभागाचा आढावा घेत असतात.
५० टक्के पदे रिक्त
मनपामध्ये वर्ग १ ते वर्ग ४ मिळून ११ हजार ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी ७ हजार ७५० पदे भरली असून तब्बल ४ हजार २५० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ३५ टक्के आहे. वर्ग १ मधील २१४ पैकी १०० हून अधिक पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची ६१ पैकी ५० पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मधील ३ हजार ८१२ पैकी २ हजार २५० पदे रिक्त आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची ४ हजार ७५० पदे रिक्त आहे. याचा विचार करता मनपात ५० टक्के पदे रिक्त आहेत.