मनपाच्या दोन सीएनजी बस आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:05 AM2020-02-11T00:05:15+5:302020-02-11T00:06:44+5:30
महापालिकेच्या आपली बसच्या हिंगणा येथील ऑरेंज सिटी स्ट्रीट येथील बसडेपोत उभ्या असलेल्या दोन सीएनजी बसला रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या आपली बसच्या हिंगणा येथील ऑरेंज सिटी स्ट्रीट येथील बसडेपोत उभ्या असलेल्या दोन सीएनजी बसला रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मे.हंसा सिटी बस ऑपरेटर सर्व्हिसेस या ऑपरेटरव्दारे चालविल्या जाणाऱ्या व डेपोत उभ्या असलेल्या सीएनजीवर चालणाऱ्या बस क्रमांक एमएच ३१ सीए ६०५२ व एमएच सीए ६०६४ या दोन्ही बसला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत दोन्ही बस पूर्णपणे जळून खाक झाल्या. आगार व्यवस्थापक व रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने अनुचित प्रकार घडला नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. महापालिकेच्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. शासकीय संपत्तीचे नुकसान झाल्याने यासंदर्भात पोलिसांत तक्रार करून विमा दावा दाखल करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.