अनेक रुग्णालयांचा २४ तास पोस्टमार्टेमला ‘ना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:09 PM2019-11-26T23:09:37+5:302019-11-26T23:16:03+5:30
२४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. परंतु अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणे देत आजही राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळचे ७ वाजताच शवविच्छेदन होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे ‘पोस्टमार्टेम’ (शवविच्छेदन) करण्याचा ब्रिटिशकालीन कायदा बदलून २४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. परंतु अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणे देत आजही राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळचे ७ वाजताच शवविच्छेदन होत नाही. याला एखादे प्रकरण अपवाद राहू शकते. परंतु रात्री येणारे मृतदेह हे शीतपेटीत ठेवले जात असून दुसऱ्या दिवशीच शवविच्छेदन केले जात आहे.
पूर्वी पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नव्हत्या. अपुऱ्या उजेडात शवविच्छेदनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे अशक्य होते. या जुन्या कायद्यामुळे आधीच दु:खात बुडालेल्या मृतांच्या नातेवाईक व आप्तस्वकीयांना या कायद्यामुळे त्रास व्हायचा. तो कमी व्हावा या उद्देशाने तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात खुनाचे, हुंडाबळी व इतर काही महत्त्वाची प्रकरणे वगळता इतर प्रकरणांमध्ये चौविसही तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील सूचना सर्वच शासकीय रुग्णालयांना देण्यात आल्या. सुरुवातीला काही रुग्णालयांनी पुढाकारही घेतला. परंतु मंत्री बदलताच मनुष्यबळ, आवश्यक सोई व तांत्रिकदृष्ट्या रात्री शवविच्छेदन करणे शक्य नसल्याची कारणे देत काही रुग्णालयांनी सायंकाळी ७ वाजतानंतर शवविच्छेदन करणेच बंद केले. विशेषत: विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये हा प्रकार होत आहे.
यासंदर्भात काही न्यायवैद्यकशास्त्र तज्ज्ञाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, तांत्रिकदृष्ट्या दिवसाच्या लख्ख प्रकाशातच शवविच्छेदन करण्याचा नियम आहे. कारण, शवविच्छेदन करताना अनेक छोट्या-छोट्याबाबींचे निरीक्षण केले जाते. यासाठी भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते. रात्रीच्यावेळी कितीही मोठा व्हॅटचा दिवा लावल्यास अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. फारच गरज असल्यास विशेषत: कायदा व सुव्यवस्थेच्यावेळी व पोलिसांच्या मागणीला घेऊन रात्री शवविच्छेदन केले जाते. शिवाय, दिवसाच्या तुलनेत रात्रीच्यावेळी फार कमी मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. जे रात्री येतात तेच सकाळीच ‘पोस्टमॉर्टेम’ करून देण्याचा आग्रह करतात. महत्त्वाचे म्हणजे, चौविस तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्यासाठी एका पाळीमध्ये एक डॉक्टर दोन अटेंडन्स आणि एक तंत्रज्ञ अशा चार लोकांची टीम हवी असते. परंतु काही रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. ही समस्या निवासी डॉक्टरांना हाताशी धरून सोडविता येत असली तरी अटेंडन्स आणि तंत्रज्ञामुळे अडचण येत असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.