३.५० लाख पगारातही नकार; नागपूर फ्लार्इंग क्लब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:15 AM2018-10-12T11:15:35+5:302018-10-12T11:16:58+5:30
नागपूर फ्लार्इंग क्लबकरिता कोणताही उमेदवार चीफ फ्लार्इंग इन्स्ट्रक्टर (सीएफआय) या पदावर मासिक ३.५० लाख वेतनावर काम करण्यास तयार नाही.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर फ्लार्इंग क्लबकरिता कोणताही उमेदवार चीफ फ्लार्इंग इन्स्ट्रक्टर (सीएफआय) या पदावर मासिक ३.५० लाख वेतनावर काम करण्यास तयार नाही. राज्य शासनाने हे वेतन २००६ मध्ये निश्चित केले होते. पण आता बंद पडलेले फ्लार्इंग क्लब सुरू करण्यासाठी सीएफआयच्या मागणीनुसार राज्य शासनाला जीआरमध्ये बदल करावा लागेल.
उमेदवारांकडून दरमहा किमान ५.५० लाख रुपयांची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीएफआय निवडीसाठी स्थापन केलेल्या निवड समितीने उमेदवारांकडून लेखी स्वरुपात वेतनाची मागणी करण्यास सांगितले आहे. त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल. २७ सप्टेंबरला मुंबईत अपर मुख्य सचिवांनी नागपूर फ्लार्इंब क्लबच्या सीएफआय पदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यात केवळ एक उमेदवार रवी जयस्वाल पोहोचले तर पुड्डुचेरीचे दुसरे उमेदवार आले नाहीत.
पूर्वी निर्धारित केलेल्या या वेतनाला १२ वर्षांचा कालावधी लोटला आहे. यादरम्यान दोन वेतन आयोग लागू झाले. राज्यातील एकमेव फ्लार्इंग क्लबला नवसंजीवनी मिळावी म्हणून वेतनात वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरी बाजू पाहता सीएफआय पदाच्या पात्रतेसाठी २२०० तासाचे फ्लार्इंग आवश्यक आहे. तांत्रिक आणि सुरक्षेशी जुळलेल्या या नियमात बदल करण्याची काहीही शक्यता नाही. नागपूर फ्लार्इंग क्लबच्या विमानाने १७ जून २०१७ ला अखेरचे उड्डाण भरले होते. सीप्लेन चालविण्यासाठी राज्य शासन भर देत आहे. ही व्यवस्था नागपुरात उपलब्ध नाही.
..तर रद्द होईल मान्यता
वेळेपूर्वी नागपूर फ्लार्इंग क्लब सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशन व नागरिक उड्ड्यण मंत्रालयाकडून क्लबची मान्यता संकटात येऊन प्रसंगी रद्द होऊ शकते. नागपूर फ्लार्इंग क्लब सुरू ठेवल्यास देशातील सर्वाेत्कृष्ट फ्लार्इंग क्लब होऊ शकतो.
प्रशिक्षणार्थी अधांतरी
लाखो रुपये शुल्क देऊन प्रवेश घेतलेल्या २० प्रशिक्षणार्थींचे एक वर्ष वाया गेले आहे. क्लबमध्ये पूर्वी २३ प्रशिक्षणार्थी होते. त्यापैकी तिघांनी क्लब सोडला आहे. क्लब व्यवस्थापनाने हताश होऊन रिफंड देण्याची तयारी दर्शविली होती.
उमेदवार कमी मागणी जास्त!
२२०० तास फ्लार्इंग केलेल्या वैमानिकांची देशात विमान उड्डयण क्षेत्रात मागणी आहे. अशा वैमानिकांना विदेशातही जास्त मागणी असते.