आत्महत्येची धमकी देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:35 AM2020-12-17T04:35:59+5:302020-12-17T04:35:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एटीकेटी’ची परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून घेतली तर आत्महत्या करू, अशी विद्यार्थ्यांनी धमकी दिल्यानंतर राष्ट्रसंत ...

No action was taken against the students who made suicide threats | आत्महत्येची धमकी देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई नाही

आत्महत्येची धमकी देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘एटीकेटी’ची परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून घेतली तर आत्महत्या करू, अशी विद्यार्थ्यांनी धमकी दिल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात खळबळ उडाली होती. अशा प्रकारे थेट आत्महत्येची धमकी देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठाने कारवाई केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थी संघटनेकडून यासंदर्भात विद्यार्थ्यांना भडकविण्यात आले. संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे पाऊल का उचलण्यात आलेले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या सत्रातील परीक्षा बाकी आहेत. ‘एटीकेटी’च्या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन आणि ‘मिक्स मोड’ अशा तीन प्रकारात घेण्यात येणार आहेत. मात्र विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ ‘ऑफलाईन’ माध्यमातून परीक्षा होतील, असा अपप्रचार केला व विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी देणारे ‘एसएमएस’ पाठवावे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यासह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे ‘एसएमएस’ पाठविले. मुळात परीक्षा कशा पद्धतीने होईल, याचा निर्णय प्राधिकरण व प्रशासन यांचा असतो. त्यांच्यावर अशा पद्धतीने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विद्यापीठानेदेखील ही बाब गंभीरतेने घेतली नाही. भविष्यात खरोखर अशा प्रकारे एखादी दुर्घटना घडली तर त्यानंतर विद्यापीठावर दोषारोप होऊ शकतात. असे असतानादेखील विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी याची साधी माहिती पोलिसांना देण्याची तसदी घेतलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्येदेखील चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याची भीती विद्यापीठातीलच एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केली.

१५ जानेवारीअगोदर आटोपणार ‘एटीकेटी’च्या परीक्षा

यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी या मुद्यावर बोलण्यास नकार दिला. परंतु विद्यार्थ्यांची ‘एटीकेटी’ची परीक्षा केवळ ‘ऑफलाईन’ नव्हे तर ‘ऑनलाईन’ व ‘मिक्स मोड’मध्येदेखील होणार असल्याचे सांगितले. ९ किंवा १५ जानेवारीपर्यंत सर्व पेपर आटोपण्याचे नियोजन केले आहे. यासंदर्भातील दिशानिर्देशदेखील तयार झाले असून, महाविद्यालयाच्या पातळीवर परीक्षा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: No action was taken against the students who made suicide threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.