१२९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी; नागपूर विद्यापीठाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:24 PM2019-05-20T12:24:11+5:302019-05-20T12:24:40+5:30
बारावीचे निकाल तोंडावर असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १२९ संलग्नित महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांत प्रवेशबंदी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीचे निकाल तोंडावर असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १२९ संलग्नित महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांत प्रवेशबंदी केली आहे. निरंतर संलग्नीकरणाची प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने त्यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे. मागील वर्षी विद्यापीठाने २५३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती.
नागपूर विद्यापीठात ५८४ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील १२९ महाविद्यालयांनी निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज केले नाहीत. यातील अनेक महाविद्यालये अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच आहेत. शिवाय महाविद्यालयांना सातत्याने ‘एलईसी’ची प्रक्रिया राबवून घ्यावी लागते. विद्यापीठात नियमांनुसार प्राध्यापक तसेच इतर सोईसुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठातर्फे ‘एलईसी’ नेमण्यात येते. मात्र महाविद्यालयांना संबंधित समितीला बोलवावे लागते. या महाविद्यालयांना वारंवार विचारणादेखील करण्यात आली. मात्र तरीदेखील काही फरक पडलेला नाही. त्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले आहेत.
दोन वर्षांपासून लागते आहे प्रवेशबंदी
नागपूर विद्यापीठाने या महाविद्यालयांना वारंवार इशारा दिला होता. संबंधित महाविद्यालयांना नोटीसदेखील बजाविण्यात आली होती. २०१७ साली ११४ तर २०१८ साली २५३ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी लावण्यात आली होती.जर मागील वर्षीच प्रवेशबंदी लावली तर त्यांचे संलग्नीकरण कायमस्वरूपी रद्द का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नामांकित महाविद्यालयांचा समावेश
प्रवेशबंदीच्या या यादीमध्ये नागपुरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांनीदेखील प्रक्रिया न राबविल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयातील अभ्यासक्रमांत प्रवेशबंदी लागू आहे की नाही याची खातरजमा करावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.