राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात योजनांच्या नावावर धूळफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:54 AM2018-11-02T10:54:11+5:302018-11-02T11:08:46+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात योजनांच्या नावावर अक्षरश: धूळफेक करण्यात येत आहे.
आशिष दुबे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात योजनांच्या नावावर अक्षरश: धूळफेक करण्यात येत आहे. विद्यार्थी कल्याणअंतर्गत विद्यापीठात १३२ हून अधिक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र विद्यार्थी विकास मंडळाच्या असंवेदनशीलतेमुळे यातील एकाही योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, अगोदर विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी चकरा मारायला लावल्या जातात. सर्व दस्तावेज सादर केल्यानंतरदेखील अनेक वर्ष अर्जांवर काहीच निर्णय घेण्यात येत नाही. काही काळाने फाईल्स धूळ खात असल्याचे दिसून येते. पालक-विद्यार्थ्यांनी विचारपूस केली तर समितीची बैठक झाली नसल्याचे कारण देत परत पाठविण्यात येते. अशा स्थितीमुळे विद्यार्थीच अर्ज करण्यासाठी कचरत आहेत. वास्तविकपणे योजना राबविण्यात व त्याची अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणा दाखविल्या जातो. त्यामुळेच अर्जांवर वर्षानुवर्षे निर्णय होऊ शकत नाही.
नियमांनुसार अर्ज आल्यानंतर मंडळाने लगेच त्यावर निर्णय घेणे अभिप्रेत आहे. मात्र असे होत नाही. अर्ज कार्यालयातच दोन ते तीन महिने पडला असतो. निर्णय घेणाऱ्या समितीची बैठक बोलविण्यातदेखील विलंब लावला जातो. समितीचा निर्णय झाल्यानंतर फाईल योजनेनुसार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येते. मात्र फाईल तेथेदेखील धूळ खात पडली असते. उर्वरित वित्त व लेखा अधिकारी कार्यालयाकडून पूर्ण करण्यात येते. अनेक विद्यार्थ्यांच्या तर फाईल्सच गायब झाल्या आहेत. याबाबतीत प्रतिक्रियेसाठी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
विद्यापीठाची अशीही असंवेदनशीलता
विद्यापीठ विद्यार्थी कल्याण योजनेत विद्यार्थ्यांना वैद्यकीय साहाय्यता निधीदेखील समाविष्ट आहे. मात्र यासाठी येणाºया अर्जांबाबत तर असंवेदनशीलतेचा कळसच गाठण्यात येतो. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रिंकू बंगाले हिची तब्येत खराब झाली. त्यामुळे तिला इस्पितळात दाखल करण्यात आले. विद्यार्थिनीकडून योजनेसाठी एप्रिलमध्ये अर्ज करण्यात आला. आतापर्यंत निर्णय झालेला नाही. तिचे वडील रवींद्र बंगाले एका दुकानात काम करतात. रिंकूचा अद्यापही उपचार सुरू आहे. आतापर्यंत अडीच लाख रुपयांचा खर्च झाला आहे. याचप्रमाणे धनवटे नॅशनल महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैदेही बांते हिचीदेखील तब्येत बिघडली. तिच्यावर उपचारांसाठी लाखोंचा खर्च आला. पालकांनी वैद्यकीय साहाय्यता निधीसाठी आॅगस्टमध्ये अर्ज केला. मात्र अद्यापही निर्णय आलेला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे वैदेही आता या जगात नाही.