गर्भातील बाळाला नाही कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:40 AM2020-03-25T00:40:38+5:302020-03-25T00:41:48+5:30
गर्भवती महिला कोरोना बाधित झाली तरी तिच्या पोटातील बाळापर्यंत हा विषाणू पोहचू शकत नाही, असा विश्वास प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गर्भवती महिला कोरोना बाधित झाली तरी तिच्या पोटातील बाळापर्यंत हा विषाणू पोहचू शकत नाही, असा विश्वास प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी दिला. गर्भाशयाचे प्लॅसेंटल बॅरियर हा विषाणू पार करीत नाही. चीन किंवा इतर देशात अशाप्रकारे गर्भवतींच्या बाळापर्यंत विषाणू पोहचण्याचे प्रकरण अद्याप तरी समोर आले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र वेगाने होत असताना गर्भवती असलेल्या महिलांमध्ये अनेक शंकामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या विषाणूची लागण झाली तर कसे होईल, पोटातील बाळाला या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे काय, प्रसूतीमध्ये काही समस्या निर्माण होतील काय, गर्भपाताचा (अबॉर्शन) प्रसंग येतो काय, डॉक्टरांशी कसे भेटावे, अशा नानाविध प्रश्नांची गर्दी त्यांच्या मनात आहे व त्यांची भीती वाढली असून डॉक्टरांना याबाबत विचारणा केली जात आहे. डॉ. रोहिणी पाटील यांनी याप्रकारची कुठलीही शक्यता नाकारली आहे. बाधित महिलेच्या पोटातील बाळापर्यंत इन्फेक्शन पोहचण्याचे कोणतेही प्रकरण सध्यातरी समोर आले नाही. गर्भपात करण्याचाही धोका नसून सामान्य महिलांप्रमाणेच त्यांचीही प्रसूती होते. त्यामुळे या शंका घेऊन घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वास डॉ. पाटील यांनी दिला.
खरे तर गर्भवती महिलांची रोग प्रतिकारशक्ती सामान्य माणसांपेक्षा आधीच कमी असते. त्यामुळे केवळ कोरोना नाही तर कोणतेही आजार किंवा विषाणूचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता गर्भवती महिलांनाच असते. त्यामुळे काळजी घेण्याचीही त्यांनाच सर्वाधिक गरज असते. विलगीकरण केल्याने व काळजी घेतल्याने कोरोनाचे इन्फेक्शन आपोआप दुरुस्त होत असले तरी त्याची लागण होण्याचा धोका अधिक आहे. गर्भवती महिलेला मधुमेह किंवा अस्थमाचा आजार असेल तर हा धोका अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळे सामान्य माणसांप्रमाणेच काळजी घ्यावी पण गर्भवती असल्याने इतरांशी कमीतकमी संपर्क येईल असे प्रयत्न करावे. बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवा आणि रक्तस्त्राव, पाणी जाणे, पोटात दुखणे (लेबर पेन) आदी आकस्मिक गरज वाटल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा आदी सूचना त्यांनी दिल्या आहेत. गर्भधारण व प्रसूती कायमच आपत्कालीन असते, त्यामुळे शक्यतो सर्व प्रकारची काळजी घेऊन या परिस्थितीत स्वत:ला सांभाळा, असे आवाहन त्यांनी केले.