बीएड, एमएड प्रवेश परीक्षेचे विदर्भात केंद्रच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 09:56 PM2019-04-18T21:56:32+5:302019-04-18T21:57:47+5:30
विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सद्यस्थितीत ‘बीएड’, ‘एमएड’ तीन वर्षीय ‘इंटिग्रेटेड’ अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रवेशपरीक्षेचे विदर्भातील एकाही जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने परीक्षेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरातील केंद्रांवर जावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सद्यस्थितीत ‘बीएड’, ‘एमएड’ तीन वर्षीय ‘इंटिग्रेटेड’ अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रवेशपरीक्षेचे विदर्भातील एकाही जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने परीक्षेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरातील केंद्रांवर जावे लागणार आहे.
यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला आहे. परिषदेने नागपूर विभागाच्या सहसंचालक डॉ.अर्चना नेरकर यांना निवेदन देऊन विदर्भात परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे. या प्रवेश परीक्षेची माहिती ‘महासीईटी’ या ‘पोर्टल’वरुन सार्वजनिक करण्यात आली. परीक्षेच्या माहितीपत्रकात विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी एकाही ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर याच शहरांची नावे नमूद आहे. त्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना याच शहरांमध्ये परीक्षेसाठी जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडदेखील बसणार आहे. बरेच विद्यार्थी तर परीक्षेपासून वंचित राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता दहा दिवसाच्या आत विदर्भात परीक्षा केंद्र द्यावे. अन्यथा अभाविपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपचे महानगर मंत्री वैभव बावनकर यांनी दिला आहे.
यासंदर्भात सहसंचालकांनी मुख्यालयात पत्र पाठवून वरील घोळ लक्षात आणून दिला आहे. परीक्षा केंद्र वाढवून देण्यासंदर्भात संचालकांनी विचार करावा, असे यात नमूद आहे.