कोई सरहद ना इन्हे रोके...

By admin | Published: April 10, 2016 03:08 AM2016-04-10T03:08:22+5:302016-04-10T03:08:22+5:30

एक काळ ते दोघेही सोबतच राहायचे. त्यांचे परस्परांवर निर्व्याज प्रेमही होते. त्यांच्या मित्रांना भेटायला ते दोघेही सोबतच यायचे. गर्दीपासून दूर राहणारे हे जोडपे.

No border would stop them ... | कोई सरहद ना इन्हे रोके...

कोई सरहद ना इन्हे रोके...

Next

महाराजबागेत फुलत आहे एक मैत्री : खऱ्याखुऱ्या निर्व्याज प्रेमाची
सुमेध वाघमारे नागपूर
एक काळ ते दोघेही सोबतच राहायचे. त्यांचे परस्परांवर निर्व्याज प्रेमही होते. त्यांच्या मित्रांना भेटायला ते दोघेही सोबतच यायचे. गर्दीपासून दूर राहणारे हे जोडपे. भल्या सकाळीच ते आपल्या मित्रांना भेटायचे आणि गर्दी वाढायला लागल्याचे पाहून निघून जायचे. पण गेल्या सहा महिन्यांपासून मात्र तो एकटाच येतो. त्याची ‘ती’ कुठे हरविली, कुठे गेली कुणालाच नाही माहीत. एक दिवस तो एकटाच आला. दु:ख, वेदनांचा टाहो त्याच्या ‘त्या’ संवेदनशील मित्रांनाच कळला. एक दिवस तो एकटाच आला आणि कदाचित दु:खावेगाने खूप रडला. संवेदना हरविलेल्या माणसांना त्याची वेदना कळलीच नसावी. आपली वेदना समजून घेणाऱ्यांना भेटायला तो आजही येतो... संवाद साधतो आणि निघून जातो... एकटाच! ही एक जगावेगळी मैत्री... या मैत्रीला ना सीमारेषा आहेत ना बंधने... हे आहे निर्व्याज मैत्रीचे प्रेम. ‘पंछी नदिया पवन के झोके कोई सरहद ना इन्हे रोके...’ ही मैत्री साऱ्याच बंधनाच्या पलीकडली आहे.

लक्ष वेधून घेतो पिंजरा
नागपूर : दोन व्यक्तींची मैत्री आणि त्यांच्यातील संवाद समजून घेता येण्यासारखा आहे. पण प्रत्येक सजीवाला भावना असतात. गाईचे डोळे ममत्वाच्या भावनेने भारले असतात... श्वानही आपल्या पिल्लांवर प्रेम करतो... माकडदेखील भावसमृद्ध असतातच. प्राण्यांमध्येही संवाद होत असावाच. केवळ माणूसच नव्हे तर काही प्रमाणात प्राणी, पक्षीही भावसमृद्ध असलेच पाहिजे. त्यांना मिळालेल्या निसर्गदत्त भावनेशी मात्र प्राणी, पक्षी एकनिष्ठ राहतात. प्रामाणिक असतात. कारण त्यांना माणसासारखा कुठलाही स्वार्थ नसतो. याचाच प्रत्यय महाराजबागमधील एका घटनेने येतो आहे. महाराजबागमध्ये फुलणारी मैत्री माणसांची नव्हे तर आपला राष्ट्रीय पक्षी मोरांच्या मैत्रीची आहे.
महाराजबागेतील वन्यप्राण्यांच्या जगात प्रवेश करतानाच डाव्या हाताला हरणांचा मोठा पिंजरा लागतो. त्यानंतर लक्ष वेधून घेतो तो मोराचा पिंजरा. यात दोन जोडपी आहेत. साधारण वर्षभरापूर्वी पहाटे ६ वाजताच्या एका घटनेने महाराजबाग जागे झाले होते. सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली. यातील एकाने घाबरत घाबरत अधिकाऱ्यांना फोन करून, मोर आणि लांडोर पिंजऱ्याच्या बाहेर निघाल्याचे सांगितले. अधिकारीही धावत-पळत आले. पिंजऱ्याच्या बाहेर मोर आणि लांडोरला पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. लोखंडी जाळीच्या पिंजऱ्याला नेमके कुठे खिंडार पडले. याचा शोध घेऊ लागले. कुठेच काही सापडत नव्हते. पिंजऱ्यातील आतील मोराची गणती केली. त्यात दोन लांडोर आणि दोन मोर. संख्या बरोबर होती. मग मोराचे हे जोडपे आले कुठून, हा प्रश्न होता. शोध घेतल्यावर तो गोरेवाडा किंवा राजभवन परिसरातून आला असावा, असा अंदाज बांधण्यात आला. या धावपळीत ते जोडपं कुठे गायब झाले कुणालाच कळले नाही. आपले मोर पिंजऱ्यात शाबूत असल्याचे पाहत सर्वांनीच नि:श्वास टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मोर आणि लांडोरचं ते जोडपं आलं. पिंजऱ्याच्या आतील दोन्ही मोर आणि लांडोर आवाज करीत नेहमीच्या जागेवर आले आणि सुरू झाले मैत्रीचे एक वेगळे पर्व.
हळूहळू हे अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांसाठी अंगवळणी पडले. रोज ते जोडपे यायचे पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला सर्व मोर, लांडोर जमायचे आणि त्यांच्या गप्पा रंगायच्या. सकाळी ६ ते ८ ही त्यांची ठरलेली वेळ. सकाळी येणाऱ्यांची गर्दीही कमी असल्याने याचा कुठेही गवगवा होत नव्हता. दिवसेंदिवस त्यांच्या मैत्रीचा रंग वाढत चालला होता. मात्र एक दिवस तो आलाच नाही. त्या दिवशी पिंजऱ्यात दिवसभर मोर आणि लांडोरच्या हालचाली वाढल्या होत्या. दुसऱ्या दिवशी तो आला, परंतु एकटाच. त्या दिवशी तो खूप ओरडल्याचे सुरक्षा रक्षक सांगतात. त्यानंतर न चुकता तो आजही एकटाच येतो. दोन-तीन तास थांबल्यानंतर निघून जातो. सोमवारी महाराजबाग बंद राहते. यामुळे शक्य झाल्यास तो दिवसभर पिंजऱ्याभोवती घुटमळतो. त्याची वाट पिंजऱ्यातील आतील मोर पूर्वी ज्या आतुरतेने पाहायचे ते आजही पाहतात. तो आल्यावर पिंजऱ्याच्या जाळीतून तो चोच आपली आत टाकतो आणि पिंजऱ्यातील वातावरण बदलूनच जाते.
त्यांची ही जगावेगळी मैत्री अशीच राहावी, असे येथील अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांनाही वाटते. परंतु ज्या परिसरातून तो येत असेल तो परिसर माणसाचा आहे.
यामुळे सुरक्षित नाही. कधीही त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. पण तो सर्व धोके पत्करून येतो, भेटतो आणि निघून जातो. महाराजबागेत त्यांची ही जगावेगळी मैत्री फुलत आहे, खुलत आहे. गरज आहे या मैत्रीला माणसाची दृष्ट लागू नये याचीच... पंछी नदिया पवन के झोके कोई सरहद ना इन्हे रोके, सरहदे इन्सानों के लिए हैं, सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां हो के. पंछी नदिया ... (प्रतिनिधी)

Web Title: No border would stop them ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.