हिवाळ्यात थंडीचा नाही, तीन दिवस पावसाचा इशारा; रात्रीचा पारा ६ अंशाने उसळला
By निशांत वानखेडे | Published: January 6, 2024 07:17 PM2024-01-06T19:17:42+5:302024-01-06T19:17:58+5:30
शनिवारी दिवसभर ढगाळीचा गारवा
नागपूर : पुढचे तीन दिवस नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी किरकाेळ ते हलक्या स्वरुपाचा पाऊस हाेण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे. त्यानुसार शेतात फवारणीची कामे टाळण्याचा व पशुधन सांभाळण्याचा इशारा जिल्हा कृषी विभागाने दिला आहे.
शनिवारी संपूर्ण दिवसभर नागपूरचे आकाश ढगांनी व्यापले हाेते. पहाटे हलके धुके व दुपारच्यादरम्यान पावसाळी वातावरणही तयार झाले. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा वाढल्याचे जाणवत हाेते. कमाल तापमानही २.८ अंशाने घसरून २५.६ अंशावर पाेहचले. दिवसाचा पारा घसरला असला तरी रात्रीच्या तापमानात माेठी वाढ झाली आहे. २४ तासात ३.४ अंशाची वाढ आणि सरासरीपेक्षा तब्बल ६.३ अंशाच्या वाढीसह किमान तापमान १८.९ अंशावर वधारले.