सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:13+5:302021-06-30T04:07:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काचूरवाही (ता. रामटेक) येथील सरपंचावर घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी मंगळवारी (दि. २९) ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काचूरवाही (ता. रामटेक) येथील सरपंचावर घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी मंगळवारी (दि. २९) दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. या सभेला एक सदस्य गैरहजर हाेता. ठराव पारित करायला नऊ सदस्यांची आवश्यकता असल्याने तसेच आठच सदस्य उपस्थित असल्याने हा अविश्वास प्रस्ताव बारगळला.
सरपंच शैलेश राऊत यांच्यावर अविश्वास ठराव घेण्यासंदर्भात काही ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याकडे तक्रार केली हाेती. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी दुपारी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. तक्रारीवर उपसरपंच शिशुपाल अजाबराव अतकरे, नरेंद्र विठ्ठल बावनकुळे, अजय गणबाजी सहारे, शिवशंकर सीताराम ईनवाते, राजश्री सुरेंद्र साकाेरे, शालू कवडू टेकाम, कल्पना विनाेद नाटकर, सुलाेचना रघुवीर माेहनकार व चंदा सुभाष काेठेकर यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने या सर्वांना सभेला उपस्थित राहण्याची नाेटीस बजावण्यात आली हाेती.
या ग्रामपंचायतची सदस्यसंख्या ११ असून, सरंपचाची निवड थेट मतदारांमधून करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३०(अ)नुसार थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाविरुद्ध ११ पैकी ९ सदस्य उपस्थित राहणे आवश्यक हाेते. मात्र, ग्रामपंचायत सदस्य अजय सहारे या सभेला गैरहजर राहिले. लंका अडकणे व पंकज देशमुख हे दाेन सदस्य या प्रस्तावापासून अलिप्त राहिले. त्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव बारगळल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.