परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्यावर अविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:53 AM2018-08-31T00:53:37+5:302018-08-31T00:56:21+5:30
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी चार आॅपरेटरची नियुक्ती करून त्यांच्यावर परिवहन सेवेची जबाबदारी सोपविली. परंतु यातील ग्रीन बस सेवा मागील काही दिवसापासून बंद आहे. रेड बस आॅपरेटरला वेळेवर बिल मिळत नसल्याने बस सेवा बंद पडण्याचा निर्माण झालेला धोका, कर्मचाऱ्यांचा वारंवार होणारा संप यामुळे शहरातील प्रवासी वेठीस धरले जात आहे. दुसरीकडे समितीला विश्वासात न घेता परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप परस्पर निर्णय घेतात. यामुळे जगताप यांना त्यांची मूळ आस्थापना असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पाठविण्यात यावे. अशा आशयाची मागणी परिवहन समितीच्या सदस्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी चार आॅपरेटरची नियुक्ती करून त्यांच्यावर परिवहन सेवेची जबाबदारी सोपविली. परंतु यातील ग्रीन बस सेवा मागील काही दिवसापासून बंद आहे. रेड बस आॅपरेटरला वेळेवर बिल मिळत नसल्याने बस सेवा बंद पडण्याचा निर्माण झालेला धोका, कर्मचाऱ्यांचा वारंवार होणारा संप यामुळे शहरातील प्रवासी वेठीस धरले जात आहे. दुसरीकडे समितीला विश्वासात न घेता परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप परस्पर निर्णय घेतात. यामुळे जगताप यांना त्यांची मूळ आस्थापना असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पाठविण्यात यावे. अशा आशयाची मागणी परिवहन समितीच्या सदस्यांनी केली आहे.
परिवहन समितीच्या बैठकीत गुरुवारी उपसभापती प्रवीण भिसीकर, अर्चना पाठक, मनिषा धावडे, वैशाली रोहणकर, नरेंद्र वालदे, उज्ज्वला शर्मा व नितीन साठवणे आदींनी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांना शिवाजी जगताप यांच्या कार्यशैलीवर असमाधानी असल्याबाबतचे पत्र दिले. समितीच्या बैठकीत वारंवार सूचना केल्यानंतरही जगताप यांनी आजवर समितीकडे अहवाल सादर केलेला नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. परंतु या दृष्टीने जगताप यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाही, असा आरोप या पत्रातून केला आहे.
महापािलकेत स्थायी समिती व परिवहन समितीला वैधानिक अधिकार आहेत. स्थायी समिती प्रमाणे परिवहन समितीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जातो. समितीला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. असे असूनही जगताप यांनी असहकाराची भूमिका स्वीकारल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविला जाणार की नाही. याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या परिवहन विभागात नियमानुसार कामे होत आहेत. ज्या कामांची तातडीने गरज आहे. अशी कामे प्राधान्याने केली जातात. यापूर्वी सुद्धा काही सदस्यांनी तक्रार केली होती. परिवहन समितीचे निर्णय डावलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
शिवाजी जगताप, व्यवस्थापक परिवहन विभाग