नागपुरात विमानतळावर ‘कोरोना’ची तपासणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 08:33 PM2020-03-03T20:33:18+5:302020-03-03T20:33:40+5:30
नागपुरात दोहा आणि शारजा येथून आंतरराष्ट्रीय विमाने येत असतानादेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या ‘थर्मल’ तपासणीची कुठलीही व्यवस्था नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात ‘कोरोना’ विषाणूचा शिरकाव झाला असताना विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपुरात दोहा आणि शारजा येथून आंतरराष्ट्रीय विमाने येत असतानादेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या ‘थर्मल’ तपासणीची कुठलीही व्यवस्था नसल्याचे चित्र आहे.
‘कोरोना’च्या भीतीमुळे विदेशी नागरिकांची येण्याची संख्या घटलेली नाही व विमानसेवेवरदेखील कुठलाही फरक पडलेला नाही. नागपूर विमानतळावर येणाºया विमानांच्या संख्येतदेखील कुठलीही घट झालेली नाही, अशी माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, ‘कोरोना’ विषाणूच्या भीतीमुळे जगातील पर्यटनाला फटका बसत असताना नागपुरात मात्र मोठा फटका बसलेला नाही. विदर्भात मोठ्या प्रमाणावर वन्य पर्यटनासाठी विदेशी पर्यटक येतात. पेंच (खुरसापार), पेंच (मध्यप्रदेश) तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनावरही फारसा परिणाम नसल्याचे सांगितले जात आहे. तसेही येथे येणाऱ्यांमध्ये इंग्लंडसह युकेमधील पर्यटकांची संख्या अधिक असते. तुलनेत चीन आणि जपानचे पर्यटक फारच नगण्य असतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये २५ ते ३० रिसॉर्ट्स आहेत. यातील काही रिसॉर्ट्समधील विदेशी पर्यटकांच्या बुकिंग मात्र रद्द झाल्या आहेत. मोहर्ली गेटवरील एका रिसोर्टमधील दोन बुकिंग रद्द झाल्याची माहिती आहे.
वैद्यकीय सेवा सज्ज
दुसरीकडे शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘कोरोना’च्या संशयित रुग्णांच्या नमुने तपासणीचे केंद्र उघडण्यात आले आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत तीन संशयित रुग्ण आढळून आले. परंतु त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. सध्या मेडिकलमध्ये एक वॉर्ड कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.