वीज दरवाढ नकोच
By admin | Published: July 14, 2016 03:01 AM2016-07-14T03:01:01+5:302016-07-14T03:02:56+5:30
महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगसमोर बहुवार्षिक वीज दरवाढ याचिका सादर केली आहे.
वीज नियामक आयोगाची जनसुनावणी : जनसामान्यांचा विरोध; तक्रारींचा पाऊस
नागपूर : महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगसमोर बहुवार्षिक वीज दरवाढ याचिका सादर केली आहे. आयोगाने या याचिकेवर बुधवारी वनामती सभागृहात जनसुनावणी आयोजित केली होती. दिवसभर चाललेल्या या जनसुनावणीदरम्यान विविध वीज ग्राहक संस्था, संघटना आणि व्यक्तिगत वीज ग्राहकांनी आपले म्हणणे मांडले. यावेळी बहुतेकांनी प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध केला. महावितरण व एकूणच वीज कंपन्याच्या विरोधात यावेळी तक्रारी आणि सूचनांचा पाऊस पडला.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे सदस्य सचिव अश्विनी कुमार, सदस्य दीपक लाड आणि अजीज खान यांच्या आयोगासमोर वनामती सभागृहात सकाळी जनसुनावणी घेण्यात आली. सुरुवातीला महावितरणने याचिकेसंदर्भात आपले म्हणणे विषद केले.
यानंतर वीज ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले म्हणणे सादर केले. एमआयए असोसिएशन, हिंगणाचे माजी अध्यक्ष मयंक शुक्ला यांनी सांगितले की, वीज दरवाढीचा प्रस्ताव हा अनावश्यक व सामान्य वीज ग्राहकांवर बोजा टाकणारा आहे. यामुळे श्रेणीनिहाय विचार केला तर २५ ते २८ टक्के वीज ग्राहकांवर बोजा पडणार आहे.
वीज कंपन्यांच्या अकार्यक्षमतेचा बोजा सामान्य ग्राहकांवर टाकण्यात येऊ नये, हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. महेंद्र जिचकार यांनी सांगितले की, प्रस्तावित दरवाढीचे दूरगामी परिणाम सर्वच ग्राहकांवर होतील.
एसआयटी चौकशी व्हावी
देवेंद्र गोडबोले यांनी यावेळी प्रशासकीय दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेचा बोजा सामान्य वीज ग्राहकांवर टाकला जात असल्याचे सांगितले. अनेक लोकप्रतिनिधी आणि त्यांचे नातेवाईक हे कंत्राटदार आहेत. त्यांनाच कामे दिली जातात. ती निकृष्ट केली जात असल्याने एकच काम वारंवार केले जाते. यातून खर्च वाढतो. याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जुने दर आणखी दोन वर्षे तसेच ठेवण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.