PM मोदींच्या दौऱ्याआधी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; सुरक्षा यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:57 AM2022-12-02T09:57:23+5:302022-12-02T09:59:43+5:30
सुरक्षा यंत्रणा सतर्क : प्रशासनही सज्ज, उद्घाटनाची तयारी जोरात
आनंद डेकाटे - फहीम खान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख निश्चित होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, प्रशासनही सज्ज झाले आहे. त्याअंतर्गत समृद्धी महामार्गाचा नागपुरातील ‘एन्ट्री पॉइंट’ बंद करण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ‘लोकमत’ने गुरुवारी समृद्धी महामार्गाची ‘ऑन द स्पॉट’ पाहणी केली. नागपुरातील गुमगाव खडका येथून समृद्धी महामार्गाला सुरुवात होते. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी जनावरे किंवा कुणीही महामार्गावर थेट येऊ नये म्हणून टिनपत्र्याचे संरक्षण उभारण्यात आले आहे. महामार्ग सुरू झाल्यावर वाहन चालकांसाठी महामार्गावरील टोल प्लाझावर पेट्रोल पंपाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
१५ हजार लोकांसाठी डोमची व्यवस्था
या कार्यक्रमासाठी १५ हजार लोक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनीसुद्धा गुरुवारी दुपारी अधिकाऱ्यांसोबत लोकार्पण स्थळाची, डोमची पाहणी केली.
हेलिपॅडची उभारणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समृद्धी महामार्गावर नेमके रस्ता मार्गाने येणार की, हेलिकॉप्टरने याबाबत सध्यातरी संभ्रमच आहे. मात्र, प्रशासन दोन्ही दृष्टीने तयारीत आहे. टोल प्लाझाजवळ महामार्गाला लागून हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे. यासोबतच ते महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर महामार्गावर काही अंतर वाहनाने फिरणार असल्याचेही सांगितले जाते.
महिला चालविणार टोल प्लाझा
समृद्धीवरील टोल प्लाझाची जबाबदारी सांभाळणाऱ्या फास्ट गो इन्फ्राने येथील टोल प्लाझावरील एक संपूर्ण शिफ्ट महिलांचीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एका शिफ्टमध्ये २० महिला राहतील. महिलांची शिफ्ट ही सकाळी राहील. असे टोल प्लाझाचे सीईओ संताेष पवार यांनी सांगितले.
ठळक वैशिष्ट्ये
nनागपूर- शिर्डी समृद्धी महामार्गाचे अंतर ५२० किमी
nमहामार्गाची रुंदी १२० मीटर
nआठपदरी मार्ग
nमहाराष्ट्रातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जातोय
nप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २४ जिल्हे आपसात जुळतील
nनागपूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास ८ तासांत आणि नागपूर ते शिर्डीपर्यंतचा प्रवास ५ तासांत पूर्ण होण्याचा दावा
nमहाराष्ट्र राज्य विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार प्रकल्पावर २५,१६५.३४ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर याचा एकूण खर्च ५५,३३५.३४ कोटी रुपये आहे.