पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; उद्घाटनाची तयारी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 07:30 AM2022-12-02T07:30:00+5:302022-12-02T07:30:01+5:30
Nagpur News नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे.
आनंद डेकाटे - फहीम खान
नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख निश्चित होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, प्रशासनही सज्ज झाले आहे. त्याअंतर्गत समृद्धी महामार्गाचा नागपुरातील ‘एन्ट्री पॉइंट’ बंद करण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ‘लोकमत’ने गुरुवारी समृद्धी महामार्गाची ‘ऑन द स्पॉट’ पाहणी केली. नागपुरातील गुमगाव खडका येथून समृद्धी महामार्गाला सुरुवात होते. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी जनावरे किंवा कुणीही महामार्गावर थेट येऊ नये म्हणून टिनपत्र्याचे संरक्षण उभारण्यात आले आहे. महामार्ग सुरू झाल्यावर वाहन चालकांसाठी महामार्गावरील टोल प्लाझावर पेट्रोल पंपाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त गुरुवारी सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी व त्यांच्या पथकांनी समृद्धी महामार्गाच्या रस्त्याची पाहणी केली. यादरम्यान पंतप्रधान ज्याठिकाणी महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत. त्या स्थळापर्यंतच्या सुरक्षेसाठी काय- काय उपाययोजना आवश्यक राहतील, याचे निरीक्षणही करण्यात आले.
- उद्घाटन कार्यक्रम, १५ हजार लोकांसाठी डोमची व्यवस्था
उद्घाटन समारंभ समृद्धी महामार्गाच्या टोल प्लाझावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुरुवातीला ५ हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु आता १५ हजार लोक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनीसुद्धा गुरुवारी दुपारी अधिकाऱ्यांसोबत लोकार्पण स्थळाची, डोमची पाहणी केली. महामार्गाचेही निरीक्षण करीत तयारीसंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
-हेलिपॅडची उभारणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी येतील हे पक्के असले तरी त्यांच्या कार्यक्रमाचा दौरा अजूनही आलेला नाही. त्यामुळे ते समृद्धी महामार्गावर नेमके रस्ता मार्गाने येणार की, हेलिकॉप्टरने याबाबत सध्यातरी संभ्रमच आहे. मात्र, प्रशासन दोन्ही दृष्टीने तयारीत आहे. टोल प्लाझाजवळ महामार्गाला लागून हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे. यासोबतच ते महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर महामार्गावर काही अंतर वाहनाने फिरणार असल्याचेही सांगितले जाते.
- महिला चालविणार टोल प्लाझा
समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझाची जबाबदारी सांभाळणाऱ्या फास्ट गो इन्फ्राने येथील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने येथील टोल प्लाझावरील एक संपूर्ण शिफ्ट महिलांचीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एका शिफ्टमध्ये २० महिला राहतील. महिलांची शिफ्ट ही सकाळी राहील. त्यावेळी संपूर्ण टोल प्लाझावर महिला कर्मचारीच दिसून येतील. यासाठी परिसरातील महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यात आल्याचे टोल प्लाझाचे सीईओ संताेष पवार यांनी सांगितले.
ठळक वैशिष्ट्ये
-नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्गाचे अंतर ५२० किमी
- महामार्गाची रुंदी १२० मीटर
- आठपदरी मार्ग
- महाराष्ट्रातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जातोय
- प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २४ जिल्हे आपसात जुळतील
- नागपूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास ८ तासांत आणि नागपूर ते शिर्डीपर्यंतचा प्रवास ५ तासांत पूर्ण होण्याचा दावा
- महाराष्ट्र राज्य विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार प्रकल्पावर २५,१६५.३४ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर याचा एकूण खर्च ५५,३३५.३४ कोटी रुपये आहे.