टायर योग्य स्थितीत नाहीत तर, समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 08:00 AM2023-04-07T08:00:00+5:302023-04-07T08:00:07+5:30

Nagpur News वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

'No entry' on Samriddhi Highway if tires are not in proper condition | टायर योग्य स्थितीत नाहीत तर, समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’

टायर योग्य स्थितीत नाहीत तर, समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’

googlenewsNext

 

सुमेध वाघमारे

नागपूर : समृद्धी महामार्गावरील अनेक अपघातांचे मुख्य कारण म्हणजे टायर फुटणे किंवा टायरशी संबंधित समस्या आहेत. टायर्स सुरक्षित प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे नागपूर ग्रामीण आरटीओने टायर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी नुकतेच परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर आरटीओ अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील वाहनांचा कसून तपासणीसोबतच दोषी वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

-पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के

सुरक्षित प्रवासासाठी टायर्स योग्य स्थितीत असणे गरजेचे असते. वेळोवेळी टायर तपासणे आणि इतर भागांइतकीच टायर्सची सुद्धा योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. परंतु बहुसंख्य वाहन चालक त्याकडेच दुर्लक्ष करीत असल्याने हे टायर्सच अपघाताला मुख्य कारण ठरतात. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत टायर पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर टायर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के आहे.

-२२ प्राणांतिक अपघातात ३६ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत २२ प्राणांतिक अपघात झाले. त्यात ३६ जणांना आपला जीव गमवावा लागला. ही संख्या खूप मोठी असल्याने आरटीओने कठोर कारवाईची भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

-एकाच दिवशी सहा वाहनांवर कारवाई

आरटीओच्या वायुवेग पथकाने गुरुवारी समृद्धी महागार्मावरील वाहनांची तपासणी करून दोषी सहा वाहनांवर कारवाई केली. यात चुकीच्या लेनवर धावणाऱ्या ‘एमएच ११ बीएल ४१०७’, ‘एमएच २७ ए ९९२७’ व ‘एचआर ३८ एडी ४८३९’ या क्रमांकाच्या वाहनांवर तर, योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या ‘एमएच २७ बीझेड ५००४’, ‘डीएल ९ सीएयू ८३८९’ व ‘एमएच ३० एझेड १६५२’ या वाहनांना प्रवेश रोखून मोटार वाहन कायद्यानुसार जवळपास प्रत्येकी २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला.

-गुळगुळीत टायर्समुळे अपघाताचा धोका अधिक

टायर्सना एक आयुष्य असते. त्यानंतर ते खराब होतात किंवा वापरण्यालायक राहात नाहीत. टायर्स गुळगुळीत झाले असल्यास अपघाताचा धोका कित्येक पटीने वाढतो. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वायुवेग पथकाकडून तपासणी केली जात आहे. यात वाहनाचा फिटनेससोबतच टायर्सकडे विशेष लक्ष दिले जात आहे. योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश रोखला जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

-विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

Web Title: 'No entry' on Samriddhi Highway if tires are not in proper condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.