ना उत्खनन, ना संशाेधन; विदर्भातील शंभरावर लेण्यांचा वाली काेण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 10:40 AM2022-04-18T10:40:50+5:302022-04-18T12:08:11+5:30
सम्राट अशाेक व त्यांचा नातू दशरथ यांनी बाैद्ध भिक्षूंच्या निवास व वर्षावासासाठी पहिल्यांदा या लेण्या तयार केल्या. पुढे महाराष्ट्रासह इतर भागात त्यांचा प्रसार झाला.
निशांत वानखेडे
नागपूर : आपल्या देशात १२०० च्यावर लेणी आहेत, ज्यातील १००० तर एकट्या महाराष्ट्रात आहेत. तशा विदर्भातही शंभरावर लेणी आहेत. भारतातील अनेक नामांकित लेण्यांचे उत्खनन व संशाेधन झाले; पण विदर्भातील लेण्यांची कायम उपेक्षा झाली. पुरातत्त्व विभाग व सरकारनेही हा वारसा जाेपासण्यासाठी पावले उचलली नाही. अशा उपेक्षितपणामुळे हा वारसा भग्न हाेऊन नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहे.
पुरातत्त्व अभ्यासक आणि वायसीसीईच्या गणित व मानविकी विज्ञान विभागाचे प्राध्यापक डाॅ. आकाश गेडाम यांनी विदर्भातील अशा शंभरावर लेणी, बाैद्ध स्तूप, चैत्य, गुहा यांचे अभ्यासपूर्ण दस्तावेज तयार केले आहेत. इजिप्त, ग्रीक, राेमन साम्राज्यात शिल्पांची प्रथा सुरू झाली; पण भारतात बाैद्ध धम्माच्या आगमनाबराेबर या कलेचा खऱ्या अर्थाने विकास झाला. सम्राट अशाेक व त्यांचा नातू दशरथ यांनी बाैद्ध भिक्षूंच्या निवास व वर्षावासासाठी पहिल्यांदा या लेण्या तयार केल्या. पुढे महाराष्ट्रासह इतर भागात त्यांचा प्रसार झाला.
विदर्भात सातवाहन आणि वाकाटक काळात अनेक लेणी, चैत्यगृहे, स्तूप तयार झाले. विदर्भातील बहुतेक लेण्या बाैद्ध आणि काही हिंदू धर्मियांच्याही आहेत. त्या प्रत्येक लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बाैद्धधर्मीय लेणी व शिल्पांवर हिनयान व महायान या दाेन पंथाचा प्रभाव दिसून येताे. भद्रावती येथील विजासन लेणी धार्मिक ऐक्याचा सर्वाेत्तम नमुना आहेत. येथे बाैद्ध, जैन आणि हिंदू संप्रदायाचे पुरातत्त्वीय अवशेष आहेत. डाॅ. गेडाम यांनी नाेंदविलेल्या काही ठळक लेण्यांचा येथे आवर्जून उल्लेख करणे गरजेचे आहे.
चांडाळा लेणीपासून निर्मितीला सुरुवात
- मांढळ जवळ उमरेड कर्हांडलाच्या जंगलात असलेली चांडाळा लेणी विदर्भातील सर्वात प्राचीन लेखयुक्त लेणी म्हणून गणली जाते. या लेणी टेकडीच्या पायथ्यापासून २० फूट उंचावर आहेत. या जवळच अडम व पवनी हे बाैद्ध क्षेत्र प्रसिद्ध आहे.
- पवनीच्या वायव्येस वैनगंगा नदीकाठी काेरंभी या गावी महादेवाच्या डाेंगरात दाेन लेण्या काेरलेल्या आहेत.
- भंडारा जिल्ह्यात बिजली, कचारगड येथे तसेच चांदसूरज नावाच्या टेकडीत लेणी काेरलेली आहेत. गायमुख व आमगाव येथेही अशा लेण्या आढळल्या आहेत.
- वर्धेच्या उत्तरेस ढगा येथील डाेंगरात लेणी अस्तित्वात आहेत. येथे महाशिवरात्रीला यात्राही भरते.
- यवतमाळ जिल्ह्यात कळंब व निंबदारव्हा, बुलडाणा जिल्ह्यात पिंपळगाव राजा येथे लेण्यांचे अस्तित्व आहे.
- अकाेला जिल्ह्यात पातूर येथे बाळापूर मार्गावर असलेले दाेन माेठे विहार केंद्र शासनाद्वारे संरक्षित आहेत.
- अमरावतीपासून ६५ किमी अंतरावर सालबर्डी या गावी सातपुडा पर्वतात दाेन बाैद्ध लेणी काेरलेल्या आहेत. येथे बुद्धाची आसनस्थ प्रतिमा आणि जातककथेचे अंकनही आहे.
- चंद्रपुरात माेहाडी येथे पाच लेणींचा समूह आहे. सम्राट अशाेकाचे महामात्रा यांनी काेरलेला लेख व सातवाहन काळातील लेख येथे आढळला.
- चंद्रपुरात पठाणपुरा गेटच्या बाहेर डब्ल्यूसीएलच्या आवारात माना टेकडीत पाच बाैद्ध लेणी हाेती, जी त्यांनी नष्ट केली.
अशा शंभरावर लेणी तसेच स्तूप आणि चैत्यगृहाचे अवशेष सापडलेले आहेत; मात्र शासनातर्फे आणि पुरातत्त्व विभागातर्फे त्यांच्या संशाेधनाबाबत पुढाकार घेतला जात नाही. या लेणी नष्ट हाेत आहेत किंवा केल्या जात आहेत. हा प्राचीन वारसा आपण गमावत चाललाे आहेत.
- डाॅ. आकाश गेडाम, पुरातत्त्व अभ्यासक