प्रवासभाडे सुपरफास्टचे, ब्लँकेट, नॅपकिनही नाही ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:18+5:302021-07-15T04:07:18+5:30
लोकमत विशेष आनंद शर्मा नागपूर : कोरोनामुळे मार्च २०२० पासून नियमित रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. ...
लोकमत विशेष
आनंद शर्मा
नागपूर : कोरोनामुळे मार्च २०२० पासून नियमित रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या सुपरफास्ट गाड्यांचे भाडे अधिक आहे. परंतु या रेल्वेगाड्यातील प्रवाशांना सव्वा वर्षापासून ब्लँकेट, नॅपकिन आणि चादरची सुविधा देण्यात येत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे अधिक प्रवासभाडे घेत असल्यामुळे त्या मोबदल्यात सुविधा देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
कोरोनाच्या पूर्वी नियमित रेल्वेगाड्यातील एसी कोचच्या कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना उशी, नॅपकिन, ब्लँकेट, चादर देण्यात येत होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाने ही सुविधा बंद केली. परंतु सुपरफास्ट रेल्वेगाड्यांच्या नावाखाली सव्वा वर्षापासून नियमित रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक प्रवासभाडे घेणे सुरू आहे. रेल्वे प्रवाशांच्या मते आधीच रेल्वेने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, डॉक्टरसह इतर श्रेणीच्या प्रवाशांना प्रवासभाड्यात सवलत देणे बंद केले आहे. यामुळे रेल्वेची कोट्यवधीची बचत होत आहे. अशा स्थितीत विशेष रेल्वेगाड्यांचे प्रवासभाडे कमी करून एसी कोचच्या प्रवाशांना आवश्यक सुविधा देण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
..................
धूळखात आहे मॅकेनाईज्ड लॉन्ड्री
रेल्वे कोट्यवधी रुपये खर्च करून अजनीत कंत्राटदारामार्फत अत्याधुनिक मॅकेनाईज्ड लॉन्ड्री तयार केली आहे. परंतु कोरोनाच्या काळात रेल्वेगाड्यात ब्लँकेट, चादर, नॅपकिन देणे बंद असल्यामुळे मेकॅनाईज्ड लॉन्ड्रीचा उपयोग होत नसून लॉन्ड्री धूळखात आहे.
सुविधा द्या किंवा भाडे कमी करा
‘कोरोनाच्या नावाखाली रेल्वे बोर्डाने एसी कोचमध्ये ब्लँकेट, चादर, नॅपकिन देणे बंद केले आहे. परंतु सुपरफास्टच्या नावाखाली प्रवासभाडे वाढविले आहे. सव्वा वर्षापासून प्रवाशांकडून अधिक पैसे घेण्यात येत आहेत. आता रेल्वे बोर्डाने प्रवाशांना सुविधा द्याव्या किंवा प्रवासभाडे कमी करावे.’
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
...................