नागपूर विमानळावरून सकाळी १० ते ६ पर्यंत उड्डाण नाही !
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 18, 2024 08:15 PM2024-04-18T20:15:37+5:302024-04-18T20:16:11+5:30
- सहा महिने सुरू राहणार काम : एएआयने रिकार्पेटिंगसाठी मागितली वेळ
नागपूर: नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून किमान पुढील सहा महिने सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत विमानाचे उड्डाण होणार नाही वा विमान धावपट्टीवर उतरणार नाही. याची माहिती विमान कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यानुसार कंपन्यांनी उड्डाणांचे नवीन वेळापत्रक तयार केले आहे. ते मार्च अखेरपासून लागू झाले आहे.
धावपट्टीचे रिकार्पेटिंग (देखभाल-दुरुस्ती) होणार असल्याने प्रवाशांना निश्चितच अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) नागपूर विमानतळाचे संचालन करणारी मिहान इंडिया लिमिटेड कंपनीकडे (एमआयएल) रिकार्पेटिंगकरिता वेळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याच्या आधारावर एएआयला वेळ उपलब्ध करून दिली. हे काम भारतीय विमानतळ प्राधिकरणाला करायचे आहे. एएआयने वेळ मागण्यासाठी पत्र दिले होते. मात्र, रिकार्पेटिंगसाठी कंत्राटदार नेमला नसून एएआयने वेळ मागितल्याचे समोर आले आहे. बहुधा त्यामुळेच ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत काम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पावसामुळे दोन महिने कोणतेही काम होणार नाही. पावसाळ्यात उड्डाणाचे नवीन वेळापत्रक रद्द होणार असले तरी प्रवाशांना दिवसा उड्डाणे मिळणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूरहून विविध ठिकाणांसाठी दररोज सरासरी ४० उड्डाणे होतात. यापैकी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाच ते सहा विमानांचे संचालन होते. आता प्रत्येकाचे वेळापत्रक बदलले आहे. धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला बराच वेळ लागतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
विमानांची उड्डाणे कमी होणार नाहीत
मिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी म्हणाले, रिकार्पेटिंगमुळे दुपारच्या वेळेतील विमानांना सकाळ आणि संध्याकाळची वेळ देण्यात आली आहे. या संदर्भात विमान कंपन्यांनीही पाऊले उचलेली आहेत. त्यामुळे नागपुरातून अन्य शहरात होणारी उड्डाणे कमी होणार नाहीत. एवढेच आहे की, लोकांना सकाळी १० च्या आधी आणि संध्याकाळी ६ नंतर प्रवास करावा लागेल.