क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग परसला नाही : मनपा आयुक्तांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:32 PM2020-05-30T23:32:14+5:302020-05-30T23:33:51+5:30
क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल्याचे वारंवार होत असलेले आरोप चुकीचे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल्याचे वारंवार होत असलेले आरोप चुकीचे आहेत.
कारण रविनगर केंद्रातील एका खोलीतील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता तर दुसरी व्यक्ती निगेटिव्ह होती. अशा परिस्थितीत, केंद्रामुळे संसर्ग वाढत आहे असे म्हणता येणार नाही.
आयुक्तांनी फेसबुक लाईव्हमधून शहरातील नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. लॉकडाऊन शिथिल झाल्यास जनतेला नियम पाळावे लागतील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. शारीरिक अंतर पाळण्याची जबाबदारी दुकानदार आणि आस्थापना प्रमुखांची असेल. मास्क वापरणे बंधनकारक राहील.
आयुक्त म्हणाले, असे आढळून आले आहे की, जेव्हा एखादा गंभीर रुग्ण खासगी रुग्णालयात येतो तेव्हा त्याला कोविड-१९ चा रिपोर्ट संदर्भात विचारणा केली जाते किंवा नमुने घेतले जातात. संबंधित रुग्णाला त्वरित उपचाराची गरज आहे म्हणून त्यावर तातडीने उपचार करा. अहवालाची वाट पाहू नका. मार्गदर्शक सूचना देखील असेच सांगते.
मानपा रुग्णालयांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. नागपूरात आलो तेव्हा परिस्थिती चांगली नव्हती. परंतु आता ४०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ती कॉपोर्रेट हॉस्पिटलपेक्षा कमी नाही. ते म्हणाले की कोविड -१९ ची सध्या जी परिस्थिती नागपुरात आहे, याचे श्रेय संपूर्ण टीमला आहे. झालेल्या चुका किंवा अपयश यासाठी मी आयुक्त म्हणून जबाबदार आहे.
प्रसिद्धीसाठी काम करत नाही
आयुक्त म्हणाले की, सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करून लोकांचे कल्याण करावयाचे आहे. मी नियम व कायद्याच्या कक्षेत राहून अधिक चांगले काम करतो. मी ग्राउंड लेव्हलवर काम करतो. प्रसिध्दीसाठी कधीही काम केले नाही. कोविडचा संसर्ग वाढताच सतरंजीपुरा, मोमीनपुरा येथे जाऊन उघडी दुकाने बंद केली.