इन्फ्रास्ट्रक्चर नाही, फिलॉसफी बदलावी लागेल

By admin | Published: November 5, 2016 02:57 AM2016-11-05T02:57:39+5:302016-11-05T02:57:39+5:30

भारत आणि अमेरिकेतील शिक्षण व्यवस्थेत खूप मोठा फरक आहे, यात काहीच दुमत नाही.

No Infrastructure, Philosophy has to be changed | इन्फ्रास्ट्रक्चर नाही, फिलॉसफी बदलावी लागेल

इन्फ्रास्ट्रक्चर नाही, फिलॉसफी बदलावी लागेल

Next

अमेरिकेत संशोधन करणारे नागपूरचे शास्त्रज्ञ भूषण पोपेरे यांचे मत
अर्चना चक्रवर्ती  नागपूर
भारत आणि अमेरिकेतील शिक्षण व्यवस्थेत खूप मोठा फरक आहे, यात काहीच दुमत नाही. म्हणूनच तर भारतातील तरुण मोठ्या आशेने पाश्चिमात्य देशांकडे बघत असतात. ‘ब्रेन ड्रेन’च्या या समस्येशी दोन हात करण्यासाठी एकूणच शिक्षण व्यवस्था बदलायची काही गरज नाही. पण शैक्षणिक धोरण मात्र बदललेच गेले पाहिजे. केवळ परीक्षेला डोळ्यापुढे ठेवून पाठांतराची जी विचित्र संस्कृती आपल्याकडे निर्माण झाली आहे ती बदलून विद्यार्थ्यांच्या मनात स्वत: त्या विषयाबद्दल प्रश्न निर्माण झाले पाहिजे, अशी व्यवस्था तयार करावी लागेल, असे विचार भूषण चंद्रकांत पोपेरे यांनी व्यक्त केले. अमेरिकेत संशोधन करणारे नागपूरचे शास्त्रज्ञ भूषण पोपेरे यांनी गुरुवारी लोकमतला दिलेल्या भेटीत भारतीय व पाश्चिमात्य शिक्षण व्यवस्थेची तुलनात्मक माहिती दिली.
भूषण पोपेरे यांनी इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई येथे इंजिनीअरिंग केल्यानंतर युनिव्हर्सिटी आॅफ मेसाचुसेट्स (यूएस) मधून पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केले. यूसी बर्कलीमध्ये पोस्टडॉक्ट्रल रिसर्च केल्यानंतर ते आता अमेरिकेतील प्रतिष्ठित रिसर्च कंपनी डाऊशी जुळले आहेत. भूषण यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून झालेला हा संवाद...
प्रश्न : तुम्ही भारत आणि अमेरिका दोन्हीकडे शिक्षण घेतले आहे. तुमच्या दृष्टीने या दोन्ही देशातील शिक्षण व्यवस्थेत काय फरक आहे?, भारतीय तरुणांची शिक्षण व नोकरीसाठी पहिली पसंती अमेरिकाच का आहे?
उत्तर : भारत आणि अमेरिका दोन्ही देशातील शिक्षण व्यवस्थेत खूप मोठा फरक आहे. आमच्याकडे लहानपणापासून पाठांतराला प्राधान्य दिले जाते तर अमेरिकेत तर्कावर आधारित शिक्षण दिले जाते. विषयाचा प्रत्यक्ष सराव करून शिकविले जाते. आपल्याकडे शिक्षक कधीच चुकत नाही, तो जे म्हणतोय ते शंभर टक्के बरोबर आहे, अशी धारणा आहे. परंतु प्रत्येक वेळी ती बरोबरच असेल असे नाही. यूएसमध्ये प्रश्न विचारण्याला प्राधान्य दिले जाते. दुसरे म्हणजे, तरुणाईचे अमेरिकेला पसंती देण्याचे कारण तेथे शिक्षण व नोकरीचे पर्याय खूप आहेत. विशिष्ट व आवडीच्या विषयात अध्यापनाची मोठी संधी तेथे आहे.
प्रश्न : पण, मग यूएसच का? युरोपीय देशांमध्ये तर अनेक प्रसिद्ध विद्यापीठे आहेत?
उत्तर : माझ्याबाबतीत सांगायचे झाल्यास मला युरोपीय देशांमध्ये जाणे कठीण वाटले. याचे कारण, या देशांची इमिग्रेशन पॉलिसी आहे. तुम्ही विद्यापीठांबाबत विचाराल तर टॉप-१० मध्ये अमेरिकेतील सर्वाधिक विद्यापीठे आहेत. मी यूएसला प्राधान्य दिले, कारण तेथे रिसर्च बेस्ड इंडस्ट्रीजवर जास्त खर्च केला जातो.
प्रश्न : भारतात तुम्हाला कुठल्या समस्या दिसतात, त्या कशा दूर केल्या जाऊ शकतात?
उत्तर : केवळ भारतच नव्हे जगातील कुठल्याही देशाला परिवर्तन अपेक्षित असेल तर तो देश आधी शिक्षित झाला पाहिजे. कुठलीही प्रस्थापित व्यवस्था सहज बदलणे शक्य नाही हे मान्य. परंतु ती बदललीच जाऊ शकत नाही, असे अजिबात नाही. आवश्यकता केवळ प्रामाणिक प्रयत्नांची आहे.
प्रश्न : तुम्हाला भारत आणि अमेरिकेतील तरुणाईतला मुख्य फरक काय जाणवतो?
उत्तर : भारतीय युवकांना अमेरिकत विशेष मान दिला जातो. याचे कारण, हे तरुण हार्डवर्कर असतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विषयाच्या तळाशी जात असतात. कुठल्याही देशातील भौगोलिक, सामाजिक वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतात. परंतु याच तरुणाईमध्ये काही नकारात्मक गोष्टीही आहेत. आमचे तरुण आपली चूक पटकन मान्य करीत नाहीत, माफी मागणे त्यांना कमीपणाचे वाटते. हा स्वभाव बदलला पाहिजे.
प्रश्न : आमच्या देशात शिक्षणाचा संबंध कमाईशी जोडला जातो. करिअर चांगले असेल तर जास्त पैसा येईल, अशी धारणा येथे आहे. काय सांगाल?
उत्तर : कुठलेही शिक्षण हे केवळ बक्कळ पैसा कमविण्यासाठी नाही तर ज्ञानवृद्धीसाठी घेतले पाहिजे. ट्रेंड काय आहे हे न पाहता तोच विषय अभ्यासाला निवडला पाहिजे जो तुमच्या आवडीचा आहे. आयुष्यातील अनेक समस्या केवळ शिक्षणामुळे सुटू शकतात, हे कुणी विसरू नये. पण, यासाठी शंभर टक्केच गुण मिळाले पाहिजे वा गुणवत्ता यादीतच आले पाहिजे, असे काही नाही.
प्रश्न : तुम्ही सध्या अमेरिकेत जी जबाबदारी सांभाळताय त्याबाबतीत काही सांगा.
उत्तर : असे समजले जाते की जगभरात दर १५ महिन्यात मायक्रो चिपचा आकार २% ने लहान होत आहे. किंवा असे समजा की कमी जागेत जास्त मेमोरी साठवण्याचे तंत्रज्ञान दर दिवसाला अधिक प्रगत होत आहे. माझे कामही असेच काहीसे आहे. जिथे मी आणि माझे कनिष्ठ सहकारी मायक्रो इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा आकार आणखी लहान करण्याच्या दिशेने कार्य करणार आहोत. ज्या डाऊ कंपनीशी मी जुळलोय ती कंपनी कॉर्पोरेट रिसर्चच्या क्षेत्रातील मोठे नाव आहे आणि तिची वार्षिक उलढाल दोन बिलियन डॉलर इतकी आहे.
प्रश्न : भूतानला गरीब देशात मोजले जाते. पण, हॅप्पीनेस इंडेक्समध्ये तो जगातील टॉप-५ देशांमध्ये आहे. याकडे तुम्ही कसे बघता?
उत्तर : हो, अगदी असे घडू शकते. आनंदाची व्याख्या ही व्यक्तिपरत्वे बदलत असते. देशात संपन्नता असली म्हणजे तो देश सुखी असेलच असे नाही. तुम्ही कशात आनंद शोधता हे जास्त महत्त्वाचे आहे. अमेरिकेतील माझ्या आनंदाचा विषय विचाराल तर तो तेथील व्यक्तिस्वातंत्र्य आहे.
प्रश्न : चांगल्या करिअरच्या शोधात असलेल्या युवांना काय सांगाल?
उत्तर : याचे उत्तर खरच साधे आहे. तेच करा जे तुम्हाला मनापासून आवडते. पण, तुम्ही जे करताय त्याचा लाभ समाजातील सर्व स्तरातील लोकांना होतोय का, हेही तपासून बघा. शिक्षण हे असे शस्त्र आहे ज्याद्वारे समोर उभ्या ठाकलेल्या प्रत्येक संकटाला परतवून लावले जाऊ शकते. असे दर्जेदार शिक्षण घ्या, खूप मोठे व्हा. पण, करिअरच्या शिखरावर पोहोचताना मानवसेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे, हे विसरू नका.

Web Title: No Infrastructure, Philosophy has to be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.