मोदींच्या विरोधात नेतृत्व नाही, पर्याय आवश्यक; पवारांचा विरोधकांच्या एकतेवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 09:49 PM2021-11-17T21:49:04+5:302021-11-17T21:49:32+5:30
Nagpur News सद्यस्थितीत विरोधकांनी एकत्रितपणे येणे जास्त आवश्यक आहे. यादृष्टीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध पक्षांशी चर्चा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षातून कोण व्यक्ती पर्याय बनू शकते किंवा विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी करतील किंवा कोणी आणखी नेता हे महत्त्वाचे नाही. सद्यस्थितीत विरोधकांनी एकत्रितपणे येणे जास्त आवश्यक आहे. यादृष्टीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध पक्षांशी चर्चा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पवार यांचे बुधवारी दुपारी चारदिवसीय विदर्भ दौऱ्यावर आगमन झाले. यावेळी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
विदर्भ दौऱ्यावर आलो असल्याने येथील शेतकरी, व्यापारी, उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. तसेच त्या दूर करण्यासाठी प्रयत्न असेल. विदर्भात पक्ष संघटन मजबुतीवरदेखील भर देण्यात येत आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे व प्रत्येक पक्षाला विविध क्षेत्रांमध्ये पक्षसंघटन बळकट करण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन पवार यांनी केले. यावेळी खा. प्रफुल्ल पटेल, माजी आमदार प्रकाश गजभिये, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे प्रामुख्याने उपस्थित होते.
पटोलेंच्या विचारधारेवरच प्रश्नचिन्ह
शरद पवार यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विचारधारेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस गांधी व नेहरू यांच्या विचारांवर चालणारे पक्ष आहेत. सहकारी पक्षांबाबत बोलताना भान ठेवायला हवे. नाना पटोले लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढले व जिंकले हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या विचारांना तेथूनच प्रेरणा मिळालेली दिसते. ही विचारधारा अफवा व गैरसमज निर्माण करणारी आहे, असा चिमटा पवार यांनी काढला.
अनिल देशमुखांवर अन्यायच झाला
शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव केला. अनिल देशमुख यांच्याविरोधात वसुलीचा आरोप लावणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त फरार घोषित करण्यात आले आहेत. ते कुठे आहेत, याचा थांगपत्ता नाही. दुसरीकडे देशमुख अद्यापही कोठडीत आहे. हे बरोबर नसून, त्यांच्यावर अन्यायच झाला आहे, असा दावा पवार यांनी केला.
...तर स्वबळावर निवडणूक लढणार
राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, तिघांनीही एकत्रितपणे निवडणूका लढल्या पाहिजे. सर्व एकत्र आले, तर आनंदच आहे. नाही तर स्वबळावर निवडणूक लढण्याची आमचीदेखील तयारी असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.
गृह विभागाची पाठराखण, रझा अकादमीवरील बंदीबाबत मौन
राज्याच्या विविध शहरांमध्ये झालेल्या हिंसाचारावरून गृह विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र शरद पवार यांनी गृह विभागाची पाठराखण केली. हा संवेदनशील मुद्दा आहे. त्रिपुरात काही झाले की नाही माहिती नाही, परंतु त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणे अयोग्य आहे. कायदा हातात घेणे जसे चुकीचे होते, तसेच त्याचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षांनी उचललेले पाऊलदेखील अयोग्यच होते. गृह विभागाने योग्य ती पावले उचलली, असे पवार म्हणाले. रझा अकादमीवर बंदीच्या मागणीवर राष्ट्रवादीच्या भूमिकेवरील उत्तर देणे त्यांनी टाळले. राज्य शासनाने विचारपूर्वक पावले उचलावी, असे त्यांनी प्रतिपादन केले.
केंद्राने अगोदर जीएसटी द्यावा
राज्य शासनावर व्हॅट कमी करण्याचा दबाव असल्याच्या मुद्द्यावर विचारणा केली असता, पवार यांनी केंद्राने अगोदर जीएसटीचा थकित निधी द्यावा. राज्याच्या तिजोरीत पैसा आल्यानंतरच व्हॅट कमी करण्यावर विचार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कंगनासारख्यांकडे दुर्लक्ष करावे
काही लोकांना बेजबाबदार वक्तव्य देण्याची सवय असते. महात्मा गांधी यांच्या विचारांच्या आदर्शांवर जगातील अनेक देश चालतात. इतक्या मोठ्या व्यक्तीबाबत बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे आहे व असे बोलणाऱ्यांकडे दुर्लक्षच करायला हवे, या शब्दांत पवार यांनी अभिनेत्री कंगना रनाैटवर टीका केली.