‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावावर उपराजधानीत ‘बत्ती गुल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:44 PM2019-08-01T12:44:43+5:302019-08-01T12:46:24+5:30
‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे.
कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ‘इमर्जन्सी आऊटएज’ केवळ बुधवारीच होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान जनता यामुळे हैराण आहे. अगोदरप्रमाणे याची कुठलीही आगाऊ माहिती देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.
बुधवारचा दिवस हा साप्ताहिक ‘मेन्टेनन्स’साठी आरक्षित असतो. महावितरणतर्फे नागरिकांना अगोदरच माहिती देण्यात येते. मात्र याअंतर्गत एकाच भागातील वीजपुरवठा वारंवार कापण्यात येत नाही. महावितरणने उन्हाळ्यामध्ये नियमांचे पालन केले नाही. ‘मेन्टेनन्स’ची निविदाप्रक्रिया न झाल्यामुळे ३० जूनपर्यंत मान्सूनपूर्व मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला. या मुद्द्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. ऊर्जामंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनीदेखील अधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. अशा स्थितीत महावितरणने नवीन मार्ग शोधून काढला आहे. ग्राहकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात येतो. वीज गेल्यानंतर ग्राहकांना ‘इमर्जन्सी आऊटएज’बद्दल ‘एसएमएस’ करण्यात येत आहेत. यात वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याची वेळ सांगण्यात येते. जर वीजपुरवठा आपात्कालीन कारणांमुळे बंद करण्यात येतो, तर समस्या ठीक कधी होईल हे अगोदरपासूनच कसे कळते, असा प्रश्न ग्राहकांकडून
उपस्थित होत आहे.
पावसामुळेदेखील अडचण
दरम्यान, दिवसभर येत असलेल्या पावसामुळेदेखील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित राहिला. यातील बहुतांश प्रकरणे व्यक्तिगत तक्रारींची होती. वर्धा मार्ग स्थित एका अपार्टमेन्टचा एक ‘फेज’ गेला होता. तक्रार केल्यानंतर काही तासांनी महावितरणचे कर्मचारी पोहोचले.
अनेक भागांमध्ये संकट
महावितरणच्या अंतर्गत येणाºया अनेक भागात बुधवारी वीजसंकट राहिले. वर्धा मार्ग, स्नेहनगर यासारख्या भागात सकाळी सकाळी वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांना नंतर ‘इमर्जन्सी आऊटएज’चा ‘एसएमएस’ आला. ‘मॅसेज’मध्ये नमूद वेळेच्या तासानंतर वीज आली. ‘मेन्टेनन्स’चे काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक अडथळ्यामुळे वीजपुरवठा आणखी वेळ खंडित राहिला, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले.