नागपुरात लॉकडाऊन नाही, रात्रीचीच जमावबंदी : पालकमंत्र्यांची घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 09:21 PM2021-03-31T21:21:22+5:302021-03-31T21:22:52+5:30

नागपूर महानगर व पोलीस आयुक्तालय परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री ८ नंतरची जमावबंदी सुरू राहील. मात्र, अन्य कुठलेही स्थानिक निर्बंध यापुढे राहणार नाहीत. म्हणजेच नागपुरात पूर्णत: लॉकडाऊन राहणार नाही, असा निर्णय बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

No lockdown in Nagpur, night curfew: Guardian Minister's announcement | नागपुरात लॉकडाऊन नाही, रात्रीचीच जमावबंदी : पालकमंत्र्यांची घोषणा 

नागपुरात लॉकडाऊन नाही, रात्रीचीच जमावबंदी : पालकमंत्र्यांची घोषणा 

Next
ठळक मुद्देअन्य निर्बंध उठविले, ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महानगर व पोलीस आयुक्तालय परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री ८ नंतरची जमावबंदी सुरू राहील. मात्र, अन्य कुठलेही स्थानिक निर्बंध यापुढे राहणार नाहीत. म्हणजेच नागपुरात पूर्णत: लॉकडाऊन राहणार नाही, असा निर्णय बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. लॉकडाऊनसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशांचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री राऊत यांनी यावेळी केली.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पालकमंत्री राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस मुंबईहून गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, खा. डॉ. विकास महात्मे, आ. गिरीश व्यास, आ. अभिजित वंजारी, आ. विकास कुंभारे, आ. ॲड. आशिष जयस्वाल, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, आ. राजू पारवे, प्रवीण दटके आदी लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिका अपर आयुक्त जलज शर्मा, आयएमएच्या अध्यक्षा अर्चना कोठारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपुरात ३१ मार्चपर्यंत निर्बंध लावण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात आणखी कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. सुरुवातीच्या लॉकडाऊनचा अनुभव पाहता पुन्हा कडक लॉकडाऊन कुणालाच नको होते. व्यापारी संघटना, मजूर कामगार आदींच्या संघटनांसह नागरिकांनीही याला विराेध होता. लॉकडाऊनमध्ये गरिबांचेच सर्वाधिक हाल होतात. हा अनुभव असल्याने ‘लोकमत’ने सुद्धा लॉकडाऊनला विरोध दर्शवित विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. याबाबत सातत्याने पाठपुरावाही केला. एकूणच नागरिकांची भूमिका आणि ‘लोकमत’चा पाठपुराव्याला अखेर यश आले. प्रशासनाने या सर्वांची गंभीर दखल घेत लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेतला; परंतु लॉकडाऊनसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशाचे कडकपणे पालना करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. म्हणजेच रात्रीची जमाववबंदी ही काटोकोरपणे राबविली जाणार आहे. यासोबतच लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे. प्रशासनाने निर्बंध हटवले. त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यांनी स्वत:च कोरोना नियमांचे पालन करून स्वत:सह इतरांनाही संक्रमणापासून वाचविण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे.

असेही निर्देश

-नागरिकांनी आरटीपीसीआर तपासणी करावी

-आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे

-बेडची संख्या वाढवावी

गृहविलगीकरणातील रुग्णांनी विशेष दक्षता घ्यावी

बेडच्या उपलब्धतेसंदर्भात समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

नागरिकांनाही बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती द्यावी

लसीकरण केंद्र वाढवण्यात यावे

होमक्वारंटाईन रुग्णांसाठी कडक निर्बंध लागू करा

कोरोनाबाधित रुग्ण होमक्वारन्टाईन असताना बाहेर फिरत असल्याच्या तक्रारींबाबत राऊत म्हणाले की, अशा रुग्णांसाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने संहिता तयार करावी व त्यानुसार कडक निर्बंध लागू करावे. रुग्णालयात बेड उपलब्ध होण्यासाठी बेड मॅनेजमेंट, ऑक्सिजनचा पुरवठा तसेच रेमडिसिवर या औषधाची उपलब्धता यावर विशेष लक्ष केंद्रित करा. कोविड हॉस्पिटलमधील रुग्ण व नातेवाईक यांचा संवाद तसेच आहार व्यवस्था चोख ठेवावी. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथील नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यामुळे यासंदर्भातील उपचाराबाबत प्रोटोकॉल तयार करावा व त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती जनतेला उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत.

विशेष नोडल अधिकारी नियुक्त

कोरोनासंदर्भातील तपासणी, लसीकरण आदींबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांच्या औषधोपचार आदींबाबत नियंत्रणासाठी विशेष नोडल ऑफिसरच्या नियुक्त्या करण्यात येणार असून ग्रामीण भागासाठी संबंधित तहसीलदार तर शहरासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

तपासणी व लसीकरण वाढविण्यासाठी आराखडा तयार करा - गृहमंत्री देशमुख

ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून यामध्ये काटोल, नरखेड, सावनेर,कामठी, हिंगणा आदी क्षेत्रांत तपासण्यांचे प्रमाण व लसीकरण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या.

जिल्ह्यात ३,५९,९५३ जणांचे लसीकरण - संजीव कुमार

मुंबई, ठाणे, पुणे यानंतर नागपूरमध्ये लसीकरण चांगले झाले, असून जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार ९५३ लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात केंद्राची संख्या वाढवून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी यावेळी दिली.

लसीकरण मोहीम, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर : राधाकृष्णन बी.

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लसीकरण मोहीम, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर विशेष भर देण्यात आला आहे. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रांवर दोनशेपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले.

Web Title: No lockdown in Nagpur, night curfew: Guardian Minister's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.