ना मास्क, ना कारवाई; कशी करणार कोरोनाशी लढाई?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:17+5:302021-09-10T04:13:17+5:30
उमरेड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास हळूहळू तिसरी लाट पाय पसरायला लागेल, असे जाणकार ...
उमरेड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास हळूहळू तिसरी लाट पाय पसरायला लागेल, असे जाणकार सांगत आहेत. सध्या कोरोना रुग्णांची आकडेवारी शून्यावर आली असली तरी अद्याप कोरोना संपलेला नाही. असे असताना आता आम्हास काहीही होत नाही, अशा तोऱ्यात बहुसंख्य नागरिक चारचौघांत, चौकात, आमने-सामने वावरताना दिसतात. ना मास्क, ना कोणत्याही प्रकारची कारवाई असे चित्र उमरेड नगरीत सर्वत्र दिसून येत आहे. अशावेळी कोरोनाशी लढाई करणार तरी कशी, असा सवाल विचारला जात आहे.
नागपूर जिल्ह्यात ‘मास्क’ न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पथकात उमरेड पालिका आघाडीवर आहे. गत वर्षभरात बेधडक कारवाई या पथकाने केली आहे. दुसरीकडे नगरपालिकेच्या पथकाची दंडात्मक कारवाई अलीकडे थंडबस्त्यात पडली आहे. आता नागरिक विनामास्क बिनभोबाटपणे गर्दीत वावरत आहेत. प्रशासन दंडात्मक कारवाईबाबत झोपेतच असल्याने दोष तरी कुणाला द्यायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रभारी उपमुख्याधिकारी आकाश सहारे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, कारवाई बंद नाही. केवळ मागील काही दिवसांपासून यामध्ये थोडी शिथिलता आल्याचे सांगितले. आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्यांकडून ५ लाख २७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. सोबतच ठरावीक अंतराच्या नियमाचा भंग करणाऱ्यांकडून २ लाख ८७ रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती त्यांनी दिली.
--
मास्कचा विसर
नागरिकांना मागील काही दिवसांपासून मास्कचा विसर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दुचाकीवर असताना, बाजारपेठेत जाताना तसेच चारचौघांत वावरताना बहुतांश नागरिक मास्कचा वापरच करताना दिसत नाहीत. दुसरीकडे चारचौघांत एखाद्याने मास्क वापरलाच तर त्याची ‘फिरकी’ घेण्याचे प्रकार घडत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नागरिकच जबाबदार राहतील, असे बोलले जात आहे.
--
आपत्तीवर आली आपत्ती
उमरेड तहसील कार्यालयाचे तहसीलदार म्हणून सुमारे तीन वर्षे प्रमोद कदम यांनी कारभार सांभाळला. कोरोनाच्या दोन वर्षांतील काळात आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून नियमाप्रमाणे त्यांच्याकडेच कारभार होता. आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांची बदली झाली. त्यानंतर बेला अप्पर तहसील कार्यालयाचे अप्पर तहसीलदार संदीप पुंडेकर यांच्याकडे उमरेड तहसीलदार पदाची अतिरिक्त जबाबदारी आली. यादरम्यान आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्य मंदावले. आपत्ती व्यवस्थापन समितीवरच नियोजनाची आपत्ती आल्याने उमरेड तालुक्यात कोरोनाचे व्यवस्थापन कोलमडले आहे.
-
अंमलबजावणी करणार
उमरेड येथील कोरोना नियोजन-व्यवस्थापन याबाबत उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणाकडे लक्ष वेधले असता, त्यांनी आपण लवकरच सभा घेऊन योग्य अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. सण, उत्सव आणि समारंभात नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले. विनामास्क फिरू नका, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.