आरएसएसने कितीही प्रयत्न केले तरी राज्यात सत्ता परिवर्तन होणार
By कमलेश वानखेडे | Published: September 4, 2024 05:37 PM2024-09-04T17:37:22+5:302024-09-04T17:37:46+5:30
विजय वडेट्टीवार यांचा दावा : २० ते २५ वर्ष भाजपचा मुख्यमंत्री नाही
कमलेश वानखेडे, नागपूर
नागपूर : राज्यातील जनता भाजपला कंटाळली आहे. महाराष्ट्रातील राजकरण एकमेका विरोधात नव्हते. वैयक्तिक विरोधात बोलण्याचे काम महाराष्ट्रात झाले. बहुजन समाज भाजपला कंटाळला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही प्रयत्न केले तरी राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. पुढील २० ते २५ वर्ष तरी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आता उपमुख्यमंत्री अजित पवार आहे लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून प्रोजेक्ट होत आहेत. ही श्रेय वादाची लढाई आहे. निवडणुकीच्या तोंडावर आहेत. यांना बहिणीचे प्रेम ओळखून आहे. हा दृष्ट भाऊ आहे. हा रक्षण करू शकत नाही. दोन चार महिन्यात पैसे देऊन मत मिळतील या भ्रमात राहु नये, असा टोला त्यांनी लगावला.
आरटीओमधील बदल्यांवर वडेट्टीवार म्हणाले, सगळ्या बदल्या राजकीय पैशाच्या भरवश्यावर होत आहेत. बोली लावली जात आहे. अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. सत्ताधारी आमदार पोलिसांची गाडी साफ करून घेतो तर पोलिसांची मानसिकता काय शिल्लक राहिली असेल. लवकर सत्तेत या नाहीतर हे लोक महाराष्ट्र खड्ड्यात घालतील असे अनेक अधिकारी आम्हाला खाजगीत सांगत आहेत, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांची ताकद रावसाहेब दानवे यांना कळली. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे पक्ष फोडायचे. त्यात दुसऱ्यांदा साथ द्यायची. दुसऱ्यांची पाळी आली की त्यांचा पक्ष फोडायचा चिन्ह पळवायचे हे पाप जे करत आहे. त्याचे कर्म भोगावे लागतील, असा चिमटाही त्यांनी घेतला.
एसटीच्या संपकारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा शब्द दिला होता. सदावर्तेच्या माध्यमातून सामावून घेऊ म्हणाले होते. पण ते झाले नाही. काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पडळकर जर एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असेल तर त्यांची भूमिका बदललेली आहे. त्यांच्या वाट्याचा वाटेकरी दुसरा झाल्याने ते परेशान झाले आहेत. पडळकर सध्या सरकारच्या विरोधी भूमिका मांडताना दिसून येत आहेत. सगळं आलबेल आहे असं म्हणता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.