नागपुरात चालले तरी काय, आठवड्याभरात दुसऱ्या पोलीस ठाण्याला बॉम्बने उडविण्याची धमकी
By योगेश पांडे | Published: August 9, 2023 03:03 PM2023-08-09T15:03:22+5:302023-08-09T15:05:04+5:30
मागील आठवड्यात सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील अशाच प्रकारे फोन करण्यात आला होता
नागपूर : एका व्यक्तीने चक्क नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या इमारतीला बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचा फोन केला व त्यामुळे खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे मागील आठवड्यात सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील असाच प्रकार झाला होता. शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचे मोठमोठे दावे पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असले तरी पोलिसांबाबतच धाक उरला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोमवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष डायल ११२ येथे अज्ञात व्यक्तीचा फोन आला व नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या इमारत बॉम्बने उडविण्यात येणार असल्याची धमकी दिली. याची माहिती बीट मार्शल अभिजीत राऊत यांना देण्यात आली. यामुळे खळबळ उडाली व पोलीस ठाण्याची सखोल तपासणी करण्यात आली. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून फोन कुठून आला होता याची माहिती काढली.
बसस्थानक परिसरातील एका दुकानासमोरून मुकेश मुन्नालाल बागडे (४७, गणेश ले आऊट) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला विचारणा करण्यात आली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने ११२ क्रमांकावर फोन करून धमकी दिल्याचे कबूल केले. जनतेमध्ये भिती निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्याला उडविण्याची धमकी दिल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मागील आठवड्यात सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील अशाच प्रकारे फोन करण्यात आला होता.