कोणत्याही मंत्र्याला बाहेर आवेशपूर्ण भाषण करण्याचा अधिकार नाही; पृथ्वीराज चव्हाणांची छगन भुजबळांवर नाव न घेता टोलेबाजी
By नरेश डोंगरे | Published: December 13, 2023 05:15 AM2023-12-13T05:15:18+5:302023-12-13T05:16:32+5:30
छगन भुजबळांवर नाव न घेता टोलेबाजी केली.
नरेश डोंगरे
नागपूर : जरांगे पाटील काही चुकीचे बोलत असेल तर त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. मात्र, कोणत्याही मंत्र्याला सभागृहा बाहेर जाऊन आवेशपूर्ण भाषण करण्याचा आणि त्यातून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा अधिकार नाही, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. मराठा आरक्षणाच्या संबंधाने विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेत सहभाग नोंदवून त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर नाव न घेता टोलेबाजी केली.
चव्हाण यांनी मराठा आरक्षणाची क्रोनोलॉजी सांगताना छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगितले. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गिय आयोग, काका कालेलकर आयोगाने मराठा समाजाला मागास दर्जा देण्यास नकार दिला अन् त्यानंतर पासून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा तिढा वाढतच गेल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मुस्लिम समाज, धनगर समाज आरक्षणालाही हात घातला. मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यावरही त्यांनी भाष्य केले.